श्री सत्य साई सेवा समितीच्या सहकार्याने शालेय इमारत आणि स्वच्छतागृहाचे उद्घाटन

श्री सत्य साई सेवा समितीच्या सहकार्याने शालेय इमारत आणि स्वच्छतागृहाचे उद्घाटन
श्री सत्य साई सेवा समितीच्या सहकार्याने शालेय इमारत आणि स्वच्छतागृहाचे उद्घाटन

ठाणे, दि. १७ ऑक्टोबर : श्री सत्य साई सेवा समिती, तळवाडे ठाणे यांच्या सहकार्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळा तळवाडे येथील शालेय इमारत आणि स्वच्छतागृहाचे उद्घाटन शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुविधायुक्त शैक्षणिक वातावरण उपलब्ध झाले आहे.

शाळेच्या नूतनीकरणांतर्गत वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी नवीन हँडवॉश सुविधा उभारण्यात आली असून, मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या वातावरणात शिक्षण घेता यावे, तसेच त्यांच्या आरोग्य आणि स्वच्छतेच्या सवयींना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने नूतनीकरणाचे काम करण्यात आले.

या उद्घाटन सोहळ्यास श्री सत्य साई सेवा समितीचे अरुण सर, देवेंद्र कोपिकर, दिगंबर सर, आनंदिता मॅडम, बूधाजी बरतड, मच्छिंद्र मराडे, शहापूरच्या सरपंच मायाताई बरतड, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी हिराजी वेखंडे, डोळखांबच्या विस्तार अधिकारी शिवानी पवार, माजी शिक्षक डोके गुरुजी, रोंगटे सर तसेच श्री सत्य साई सेवा समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी शाळेच्या विकासासाठी करण्यात आलेल्या सहकार्याचे कौतुक केले.

शैक्षणिक संस्थांच्या विकासामध्ये सामाजिक संस्थांचे योगदान महत्त्वाचे असते. श्री सत्य साई सेवा समितीने शाळेच्या नूतनीकरणासाठी पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. अशा सेवाभावी उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत मिळते.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील शिक्षकवृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने श्री सत्य साई सेवा समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.