ठाण्यात दीड दिवसांत २० हजार ७०३ गणेशमूर्तींचे विसर्जन
ठाणे, दि. १६ : ठाणे महापालिका क्षेत्रात दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन मंगळवारी भक्तीमय वातावरणात पार पडले. यंदा एकूण २० हजार ७०३ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये ११ हजार १०३ पीओपीच्या तर ९ हजार ६०० शाडू मातीच्या मूर्तींचा समावेश आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांना भाविकांनी यंदाही चांगला प्रतिसाद दिला. गतवर्षीच्या १२ हजार ९७० मूर्तींच्या तुलनेत यंदा कृत्रिम तलावांमध्ये १५ हजार ६७७ मूर्तींचे विसर्जन झाले. विशेष हौद व्यवस्थेत गतवर्षी २ हजार ६१३ मूर्तींचे विसर्जन झाले होते. यंदा ही संख्या ४ हजार ५४८ इतकी आहे.
महापालिकेच्या मूर्ती स्वीकृती केंद्रांमध्ये प्राप्त झालेल्या ३५४ मूर्तींचे तसेच फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील १२४ मूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात, तर त्यापेक्षा मोठ्या मूर्तींचे विसर्जन खाडी घाटांवर करण्यात येत आहे. पाचव्या, सातव्या आणि अकराव्या दिवशीही सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
कृत्रिम तलाव, हौद, फिरती विसर्जन व्यवस्था आणि मूर्ती स्वीकृती केंद्रांवरील विसर्जनानंतर पाण्याच्या तळाशी जमा होणाऱ्या मातीच्या गाळावर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कृती आराखड्यानुसार प्रक्रिया करण्यात येत आहे. अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली.
निर्माल्यापासून सेंद्रिय खत निर्मितीसाठी कोलशेत, कौसा आणि ऋतू पार्क येथील बायोकंपोस्टिंग प्रकल्पांमध्ये निर्माल्य जमा करण्यात आले आहे. त्यावर प्रक्रिया करून खत तयार केले जाणार आहे. निर्माल्यातील प्लास्टिक आणि थर्मोकोल यांसारख्या अविघटनशील घटकांचे वर्गीकरण करून ते पुनर्प्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहेत. यंदा निर्माल्यातील प्लास्टिक आणि थर्मोकोलचे प्रमाण गतवर्षीपेक्षा कमी झाले आहे.