भिवंडीतील IGM रुग्णालयात सर्पदंशाच्या रुग्णांसाठी ICU सुरू करण्याची मागणी
विशेष प्रतिनिधी : सौ. रूपाली मनोज बैसाने
भिवंडी : भिवंडीतील नागरिकांना सर्पदंशासारख्या आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळावेत, यासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय (IGM) येथे सुसज्ज अतिदक्षता विभाग (ICU) आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाचे भिवंडी तालुका ग्रामीण उत्तर मंडळाचे अध्यक्ष श्री. निलेश गुरव यांनी सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी मा. श्री. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे यासंदर्भात मागणी केली.
स्व. महेश सुभाष शेळके यांच्या सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे. सर्पदंशाच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने IGM रुग्णालयात ICU किंवा क्रिटिकल केअर युनिट, अँटी-स्नेक व्हेनम (ASV), व्हेंटिलेटर, आवश्यक मॉनिटरिंग उपकरणे तसेच २४ तास प्रशिक्षित डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी निलेश गुरव यांनी केली आहे.
सर्पदंशाच्या गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळाले नाहीत, तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भिवंडीतील नागरिकांना उपचारांसाठी इतर शहरांतील रुग्णालयांमध्ये धाव घ्यावी लागू नये, यासाठी IGM रुग्णालयातच आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे.
भिवंडी आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही मागणी महत्त्वपूर्ण असून, जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.