भारताला जागतिक रासायनिक उत्पादन केंद्र बनवण्याची संधी नरेंद्र मोदी
मुंबई, दि. २२ : भारताला जागतिक रासायनिक उत्पादन केंद्र बनवण्याची मोठी संधी असून, या क्षेत्रातील गुंतवणूक, संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये ॲडव्हान्टेज्ड भारत ॲन इमर्जिंग ग्लोबल केमिकल हब या संकल्पनेवर आधारित इंडिया केम २०२६ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय रसायने मंत्री जगतप्रकाश नड्डा यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थित होते.
प्रधानमंत्री मोदी यांनी संदेशाद्वारे रासायनिक उद्योगाचे महत्त्व अधोरेखित केले. कृषी, औषधनिर्मिती, वस्त्रोद्योग आणि वाहननिर्मिती यांसारख्या विविध क्षेत्रांसाठी रासायनिक उद्योग महत्त्वाचा आहे. या उद्योगाच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उच्च मूल्यवर्धित उत्पादन, शाश्वत उत्पादन पद्धती आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी भारतातील रासायनिक उद्योगाची बाजारपेठ सध्या सुमारे २२० अब्ज डॉलरची असल्याचे सांगितले. ही बाजारपेठ २०४० पर्यंत एक ट्रिलियन डॉलर, तर २०४७ पर्यंत १.६ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात स्वतंत्र रासायनिक उद्योग धोरण
रासायनिक उद्योगातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी महाराष्ट्राचे स्वतंत्र रासायनिक उद्योग धोरण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर परिसरात मोठे रासायनिक औद्योगिक केंद्र विकसित करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सुमारे ३६०० रासायनिक उद्योग असून, देशाच्या रासायनिक उद्योगातील स्थूल मूल्यवर्धनात राज्याचा सुमारे १९ टक्के वाटा आहे. या क्षेत्रातून सध्या सुमारे तीन लाख रोजगार उपलब्ध झाले आहेत. भविष्यात रोजगाराच्या संधी दुप्पट करण्याची क्षमता या उद्योगात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, विविध राज्यांचे प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, उद्योगपती आणि देशविदेशातील गुंतवणूकदार उपस्थित होते