पनवेल महापालिकेची चारही प्रभागांत अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई

पनवेल महापालिकेची चारही प्रभागांत अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई

पनवेल, दि. 22 : पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील चारही प्रभागांत अनधिकृत बॅनर, कमानी आणि फुटपाथवरील अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत विविध ठिकाणांवरील अनधिकृत बॅनर आणि कमानी हटविण्यात आल्या, तर फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्यांचे साहित्य जप्त करण्यात आले.

कळंबोली परिसरातील रोडपाली बस डेपोसमोरील भागात अतिक्रमणाविरोधात कारवाई करून साहित्य जप्त करण्यात आले. रोडपाली येथील शिवसेना शाखा कार्यालयासमोरही कारवाई करण्यात आली. शिवमंदिर परिसरातील अनधिकृत नारळपाणी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.

कामोठे येथील सेक्टर 21 मध्ये महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील हायड्रॉलिक लॅडरच्या साहाय्याने अनधिकृत कमानी हटविण्याचे काम सुरू आहे. सेक्टर 36 मधील मेट्रो केमिस्टसमोरील चौकातील दोन कमानी आणि पाच बॅनर हटविण्यात आले.

मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरातील फुटपाथवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांच्या छत्र्या आणि टेबल जप्त करण्यात आले. मुंबई पुणे महामार्गावरील रुग्णालयासमोरील दोन ठिकाणी फुटपाथवरील अतिक्रमणांविरोधात कारवाई करण्यात आली. तसेच सायन पनवेल महामार्गाच्या दोन्ही बाजूंना अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली.

पनवेल शहरातील विविध भागांत नवरात्रोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या कमानी, शुभेच्छांचे बॅनर आणि इतर अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याची मोहीम प्रभाग समिती डच्या वतीने सुरू आहे. अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत ही कारवाई करण्यात येत आहे.

खारघर परिसरातील सेक्टर 12 आणि सेक्टर 10 येथेही अनधिकृत बॅनरविरोधात कारवाई करण्यात आली. नवरात्रीच्या शुभेच्छांचे तसेच झाडांवर लावण्यात आलेले बॅनर हटविण्यात आले. डीमार्ट घरकुल जंक्शन येथील सेक्टर 14 मध्येही अनधिकृत बॅनर हटविण्याची कारवाई करण्यात आली.

अतिक्रमण हटाव मोहीम यापुढेही सुरू राहणार

शहरातील सार्वजनिक ठिकाणे, फुटपाथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे तसेच अनधिकृत बॅनर हटविण्यासाठी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत यापुढेही धडक कारवाई सुरू राहणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त महेश कुमार मेघमाळे यांनी सांगितले.