बालविवाह रोखण्यासाठी पनवेल महापालिकेचा जनजागृती उपक्रम
पनवेल, दि. २७ : बालविवाह आणि सक्तीचे विवाह यांसारख्या सामाजिक अनिष्ट प्रथांना आळा घालण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कक्षाच्या वतीने सिध्दी किरवले आणि कळंबोली येथे विशेष जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
बालविवाह व सक्तीचे विवाह निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमांमध्ये नागरिकांना बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाची माहिती देण्यात आली. बालविवाहाचे दुष्परिणाम, बालविवाह रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच बालकांचे हक्क आणि संरक्षण याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
बालविवाहासारख्या सामाजिक प्रथांना आळा घालण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने जबाबदारीने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच उपस्थित नागरिकांनी बालविवाह प्रतिबंधासाठी सामाजिक प्रतिज्ञा घेतली.
मुलींचे शिक्षण, कौशल्यविकास आणि आर्थिक स्वावलंबन यांना प्राधान्य दिल्यास बालविवाह रोखण्यास मदत होईल, असे यावेळी अधोरेखित करण्यात आले. बालविवाहाच्या घटना निदर्शनास आल्यास नागरिकांनी संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले.
महापालिका आयुक्त मंगेश चितळे आणि महिला व बालकल्याण विभागाच्या उपायुक्त डॉ. रूपाली माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व माहिती विनया म्हात्रे यांनी दिली, तर नवनीत थोरात यांनी आभार मानले.