संविधानामुळे सामान्यांना सर्वोच्च पदाची संधी
ठाणे, दि. २६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नसून माणुसकीचेही शिल्पकार आहेत. शोषित, वंचित आणि दुर्बल घटकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार, स्वाभिमान आणि समानतेची जाणीव त्यांनी संविधानाच्या माध्यमातून दिली. सर्वसामान्यांना न्याय आणि प्रगतीची संधी उपलब्ध करून देणे हाच संविधानाचा आत्मा असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित संविधान महोत्सव २०२६ मध्ये ते बोलत होते. यावेळी खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिलाताई पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंदिसे गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.
बाबासाहेबांनी जगातील विविध देशांच्या संविधानांचा अभ्यास करून भारताला सर्वोत्तम राज्यघटना दिली. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचावा आणि शोषित-वंचित समाजाला मुख्य प्रवाहात स्थान मिळावे, हा त्यांचा उद्देश होता. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देत शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा परिवर्तनाचा मंत्र दिला.
संविधानाच्या सामर्थ्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपद, आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपद आणि शेतकरी कुटुंबातील माझ्यासारख्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली, असे शिंदे यांनी सांगितले.
संविधान दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर संविधान वाचन करण्यात आले. तसेच महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्यावरही संविधान वाचनाचा कार्यक्रम झाला. चवदार तळ्याच्या परिसराच्या सुशोभीकरण आणि स्वच्छतेसाठी १०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
ठाणे महानगरपालिकेने संविधान दिनापुरता कार्यक्रम मर्यादित न ठेवता तीन दिवसीय संविधान महोत्सवाचे आयोजन केले आहे. गावदेवी मैदानावर आयोजित या महोत्सवातून संविधानाच्या विचारांचा जागर करण्यात येत असल्याचे सांगत त्यांनी महापौर, पदाधिकारी आणि आयुक्तांचे अभिनंदन केले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांनी सामान्य माणसाच्या हिताला प्राधान्य दिले. शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी राज्यकारभार केला, तर बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून न्याय, समानता आणि सन्मानाचा अधिकार दिला. २०१५ पासून देशभर संविधान दिन साजरा होऊ लागल्याने संविधानाच्या विचारांचा प्रसार अधिक व्यापक झाला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
२०४७ पर्यंत विकसित, आत्मनिर्भर आणि शक्तिमान भारत घडविण्याच्या संकल्पाचा पाया संविधानातील विचारांमध्ये आहे. बाबासाहेबांनी संविधानासोबतच माणुसकीचा पाया रचला, असे गौरवोद्गार काढत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भीमच्या घोषणांसह त्यांनी उपस्थितांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.