गोंदिया जिल्ह्यात कर्करोग तपासणीसाठी मोबाइल व्हॅन सेवा सुरू
गोंदिया, दि. २८ : जिल्ह्यातील नागरिकांना कर्करोग तपासणी आणि जनजागृतीच्या सुविधा सहज उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व केटीएस जिल्हा रुग्णालय येथे कर्करोग तपासणी मोबाइल व्हॅन सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
ही मोबाइल व्हॅन आगामी ४५ दिवस संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात फिरणार असून, विविध शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि नियोजित आरोग्य केंद्रांमध्ये नागरिकांना कर्करोगविषयक तपासणी व मार्गदर्शन उपलब्ध करून देणार आहे.
या उपक्रमामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना विशेष लाभ होणार आहे. कर्करोगाची प्राथमिक लक्षणे ओळखणे, आजाराबाबत जनजागृती करणे आणि वेळेत तपासणीसाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे, हा मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
कर्करोगावर प्रभावी उपचारासाठी वेळेत निदान आणि योग्य उपचार महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्याच्या दृष्टीने ही मोबाइल व्हॅन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच आरोग्य सेवक व सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.