कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन

कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन

मुंबई, 24 ऑगस्ट 2026

कामगारांच्या अडचणी, सेवा विषयक प्रश्न, वेतन व भत्ते, कामाच्या अटी, रोजगाराची सुरक्षितता, कायदेशीर हक्क तसेच अन्य औद्योगिक प्रश्न सोडविण्यासाठी अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन संघाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपा अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले.

अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या वतीने सहार रोड येथील कार्गो परिसरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. या कार्यालयामुळे कार्गो विभागातील कामगारांना संघटनेशी थेट संपर्क साधण्यासाठी कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध होणार असून, कामगारांच्या विविध प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्घाटन सोहळ्याला महासंघाचे सरचिटणीस सुहास माटे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध कामगार संघटनांतील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतील शेकडो वाहतूकदार आणि कर्मचाऱ्यांनी अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघात प्रवेश केला. तसेच वाहतूकदारांची संघटना असलेली ऑल इन वन ओनर्स अँड ड्रायव्हर्स असोसिएशन अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाशी संलग्न झाली. याशिवाय AIASL मधील भारतीय कामगार सेना उबाठाच्या सुमारे 450 सदस्य कामगारांनीही अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे सदस्यत्व स्वीकारले.

या प्रवेशामुळे कार्गो विभागात संघटनेची ताकद आणि प्रभाव आणखी वाढणार असल्याचे सांगण्यात आले. रविंद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले की, हा प्रवेश केवळ सदस्यसंख्येतील वाढ नसून कार्गो विभागातील कामगारांचा संघटनेवरील वाढता विश्वास आणि संघटनेच्या कार्यपद्धतीला मिळणारा व्यापक प्रतिसाद याचे प्रतीक आहे.

कामगारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटना यापुढेही प्रभावीपणे कार्यरत राहील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.