मुंबईतील शाळांच्या भौतिक सुविधा तपासणी अधिकाऱ्यांची 89 पदे तातडीने भरा
पालकमंत्री अँड. आशिष शेलार यांचे प्रशासनाला निर्देश
मुंबई, दि. 24 ऑगस्ट 2026 : मुंबई महापालिका क्षेत्रातील शासकीय माध्यमिक शाळा तसेच महापालिका, अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील भौतिक सुविधांची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची तब्बल 89 पदे रिक्त आहेत. ही बाब चिंताजनक असून रिक्त पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश मुंबई उपनगराचे पालकमंत्री अँड. आशिष शेलार यांनी प्रशासनाला दिले.
मुंबई शहर आणि उपनगरातील शाळांमधील पायाभूत सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि उपलब्ध सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अँड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित शासकीय आणि महापालिका अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी शाळांच्या भौतिक सुविधांची नियमित तपासणी आणि देखरेख याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
मुंबई महापालिका क्षेत्रात राज्य शासनाच्या मान्यतेने पूर्व उपनगरात 240 आणि पश्चिम उपनगरात 265 अशा एकूण 505 माध्यमिक शाळा आहेत. या शाळांच्या भौतिक सुविधांची तपासणी करण्यासाठी केवळ 15 शिक्षण उपनिरीक्षक आणि सहाय्यक उपनिरीक्षक कार्यरत असून त्यांच्या 18 जागा रिक्त आहेत.
याशिवाय मुंबई महापालिकेच्या 1,132 प्राथमिक शाळांसह खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांचा समावेश असलेल्या एकूण 2,132 शाळांच्या भौतिक सुविधा तपासणीसाठी विभाग निरीक्षकांची पदे आहेत. मात्र, केवळ 11 विभाग निरीक्षक कार्यरत असून तब्बल 71 पदे रिक्त आहेत.
शाळांमधील स्वच्छतागृहे, इमारती, वर्गखोल्या, वीज व्यवस्था, पाणीपुरवठा आणि सुरक्षा यांसह विविध 10 प्रकारच्या भौतिक सुविधांची तपासणी महापालिका आणि राज्य शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून दर तीन वर्षांनी केली जाते.
मात्र, मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्यामुळे शाळांच्या भौतिक सुविधा आणि शैक्षणिक व्यवस्थेची नियमित व प्रभावी तपासणी करण्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करून तपासणी यंत्रणा अधिक सक्षम करावी, असे स्पष्ट निर्देश अँड. आशिष शेलार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
शाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ नये आणि प्रत्येक शाळेत आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध असाव्यात, यासाठी नियमित तपासणी, अहवाल तयार करणे आणि त्रुटींवर तातडीने कार्यवाही करण्याची प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचेही पालकमंत्री अँड. आशिष शेलार यांनी यावेळी स्पष्ट केले.