ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते 'मुसलमानों का सियासी अजेंडा' पुस्तकाचे प्रकाशन; मुस्लिम राजकारणावर मांडली रोखठोक मते
मुंबई: प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस प्रकाशित आणि फारुख अहमद लिखित मुसलमानों का सियासी अजेंडा या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा प्रबुद्ध भारतचे संपादक ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते आंबेडकर भवन दादर, मुंबई येथे उत्साहात पार पडले. या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील विचारवंत आणि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य करत मुस्लिम समाजाच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, आसाम आणि बंगाल निवडणुकीच्या दोन महिन्यांपूर्वीच मी सांगितले होते की, बंगालमध्ये भाजप १८०-९० जागा जिंकेल आणि तेच घडले. आरएसएस आणि भाजप मला हात लावू शकत नाही, कारण मी फकीर आहे. मुस्लिमांच्या राजकीय भूमिकेवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, मुस्लिमांच्या राजकीय विचारांवर आजही मौलवींचे नियंत्रण आहे, हे कटू सत्य आहे. सध्या मुस्लिम समाज हा सर्वात मोठा टार्गेट असून, इथला नरसंहार रोखणे हे मुस्लिमांच्याच हातात असल्याचे त्यांनी नमूद केले. फारुख अहमद यांच्या पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी आवाहन केले की, हे पुस्तक प्रत्येक वस्त्यांमध्ये वाचले गेले पाहिजे आणि यावर मुस्लिम मौलवींसोबत चर्चा झाली पाहिजे.या कार्यक्रमात सुजात आंबेडकर यांनी या पुस्तकाचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, भारताच्या इतिहासात जेव्हा जेव्हा मुसलमानांवर अन्याय झाला, तेव्हा विविध संघटना आणि चळवळींनी भाजप-आरएसएस विरोधात उभे राहत मुस्लिम समाजाची बाजू घेतली. या संघर्षाचे डॉक्युमेंटेशन होणे हे पुढील पिढ्यांसाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
कार्यक्रमात उपस्थित इतर वक्त्यांनीही आपले विचार मांडले. द वायरच्या संपादिका आरफा खानुम शेरवानी यांनी मतदारांच्या अधिकारांवर होणाऱ्या गदेबद्दल चिंता व्यक्त केली, तर माजी आयपीएस अधिकारी अब्दूर रेहमान यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली. पत्रकार नवीन कुमार यांनी समानता फक्त आंबेडकरवादी चळवळीत असल्याचे सांगून संविधान जागृतीचा अभाव अधोरेखित केला. कॉ. स्मिता पानसरे यांनी दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिम यांच्या संयुक्त राजकीय ताकदीवर भर दिला. पुस्तकाचे लेखक फारुख अहमद आणि इतिहास अभ्यासक सरफराज अहमद यांनीही मुस्लिम समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वावर आपली मते मांडली.
या प्रकाशन सोहळ्याला अंजलीताई आंबेडकर (कार्यकारी संपादक, प्रबुद्ध भारत), रेखाताई ठाकूर (प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी), जनाब मुज्तबा फारुक (राष्ट्रीय सल्लागार समिती सदस्य, जमाअत-ए-इस्लामी, नवी दिल्ली), आरफा खानम शेरवानी (संपादक, द वायर), अब्दुर रेहमान (माजी आयपीएस व लेखक), कॉ. स्मिता गोविंद पानसरे (साम्यवादी नेत्या), सरफराज अहमद (इतिहास अभ्यासक), कलिम अजिम (लेखक व साहित्यिक) आणि नवीन कुमार (संपादक, आर्टिकल १९ इंडिया) या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.