पनवेल, दि. १ जुलै २०२५ – डॉक्टर्स डे निमित्त पनवेल महानगरपालिका आणि मुंबई ऑनकोकेअर सेंटर (MOC) नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 1 जुलै रोजी कम्युनिटी सेंटर, कामोठे येथे विशेष कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व डॉक्टरांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन पनवेल महानगरपालिका माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय आरोग्य विभाग प्रमुख डॉ. आनंद गोसावी, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. गणेश नायर, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. उषा राठोड, कुष्ठरोग अधिकारी डॉ. वैभवी निंबाळकर, वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक ६, १४ व १५, तसेच कामोठे प्रभागातील महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या. यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांची ओरल कॅन्सर (तोंडाचा कर्करोग) तपासणी, ३० वर्षांवरील महिलांची सर्व्हिकल कॅन्सर करिताची पॅप सिअर( Pap Smear) तपासणी व ४० वर्षांवरील महिलांची स्तनाच्या कर्करोगासाठी मॅमोग्राफी तपासणी यांचा समावेश होता.
या शिबिरात आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व स्वच्छता कर्मचारी अशा सुमारे ११० कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली.
चौकट
डॉक्टर्स डे निमित्ताने वृक्षारोपण
दिनांक ०१ जुलै २०२५ रोजी डॉक्टर्स डे निमित्त पनवेल महानगरपालिके अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ६ कामोठे येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत आरोग्य केंद्राच्या आवारात १० झाडे लावण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग प्रमुख डॉ. आनंद गोसावी, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. गणेश नायर, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. उषा राठोड, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. भूषण चव्हाण, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ६ कामोठे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभवी निंबाळकर व सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.