मुंब्रा-दिव्यात ३३ अनधिकृत नळजोडण्या खंडित
ठाणे, दि. २१ सप्टेंबर २०२६ : ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत मुंब्रा आणि दिवा परिसरातील अनधिकृत नळजोडण्यांविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ३३ अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्यात आल्या.
मुंब्रा प्रभाग समितीअंतर्गत रेतीबंदर परिसरातील चौपाटी चायजवळील वेटिंग हॉल परिसरातील एक आणि राणा बंगल्यासमोरील नाल्यातील सात अशा आठ अनधिकृत नळजोडण्या तोडण्यात आल्या. या कारवाईत पीव्हीसी पाईप जप्त करण्यात आला.
दिवा येथील प्रभाग क्रमांक २७ आणि २८ मधील येडकर नगर नाला परिसरात २५ अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्यात आली.
दरम्यान, दिवा प्रभाग समिती क्षेत्रात ७ ते १९ सप्टेंबरदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत कल्याण फाटा ते मुंब्रा बायपास परिसरासह विविध ठिकाणी १२५ अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्यात आल्या. त्यामुळे दिवा प्रभाग समिती क्षेत्रात आतापर्यंत खंडित करण्यात आलेल्या अनधिकृत नळजोडण्यांची संख्या १५० झाली आहे.
कारवाईदरम्यान सुमारे २ हजार ६७० मीटर पीव्हीसी व एचडीपी पाईप तसेच अतिरिक्त ५० मीटर पीव्हीसी पाईप जप्त करण्यात आला. अनधिकृत नळजोडण्यांमुळे नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याने अशा जोडण्यांविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार आहे. नागरिकांनी अनधिकृत पाणी जोडण्या करू नयेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.