सरकारमध्ये सत्ता, रस्त्यावर विरोध – राष्ट्रवादीची दुटप्पी भूमिका महेश पाटील, भाजपा
नागपूरचाळ हौसिंग बोर्ड परिसरातील म्हाडा पुनर्विकासाचा विषय सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मात्र या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेले आंदोलन हे जनहितापेक्षा राजकीय स्टंटबाजीचे उदाहरण असल्याची टीका भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.
विशेष बाब म्हणजे ज्या प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा स्वर्गीय मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले, त्याच प्रकल्पाला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बेकायदेशीर ठरवत सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत ताळमेळ राहिला आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
या आंदोलनात शहराध्यक्ष सुनील टिंगरे, नगरसेवक सुहास टिंगरे, नगरसेवक रवी टिंगरे, नगरसेविका शीतल सावंत आणि नगरसेविका नंदिनी धेंडे सहभागी होत्या. विशेष म्हणजे भूमिपूजनाच्या वेळीही शहराध्यक्ष सुनील टिंगरे हे अजितदादा पवार यांच्यासोबत उपस्थित होते आणि आज त्याच कामाविरोधात आंदोलनातही सहभागी झाले आहेत. त्यामुळे ही भूमिका जनतेला संभ्रमात टाकणारी आणि विरोधाभासी आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते महेश पाटील यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटले की, “दोन वर्षांपूर्वी ज्या कामाचे भूमिपूजन झाले, त्याच कामाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसला अचानक साक्षात्कार कसा झाला? जर हा विषय खरोखरच गंभीर होता, तर राज्य आणि केंद्रातील सत्तेत सहभागी असताना त्यांनी शासन स्तरावर चर्चा करून तो सोडविण्याचा प्रयत्न का केला नाही? आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न हा दुर्दैवी आहे.”
सरकारविरोधात देण्यात आलेल्या घोषणांचा भारतीय जनता पक्ष तीव्र निषेध करीत आहे. सत्तेत सहभागी राहून सरकारविरोधात आंदोलन करणे ही जनतेची दिशाभूल करणारी आणि दुटप्पी भूमिका आहे. मतभेद असतील तर ते शासनाच्या योग्य मंचावर मांडले पाहिजेत. रस्त्यावर उतरून स्वतःच्या सरकारलाच लक्ष्य करणे हे जबाबदार राजकारणाचे लक्षण नाही.
हौसिंग बोर्ड परिसरातील सर्व रहिवासी आणि गाळेधारकांना भारतीय जनता पक्ष आश्वस्त करू इच्छितो की, पुनर्विकासाच्या प्रश्नावर कोणत्याही नागरिकावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. सर्वांना न्याय मिळावा यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असून पुनर्विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील.
२०१७ साली देखील काही इमारतींचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर विविध प्रकल्पांचे सादरीकरण, मार्केटिंग आणि प्रचार करण्यात आला. त्यावेळी कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेण्यात आला नाही. मात्र आज अचानक प्रकल्पांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. यामागे जनहितापेक्षा राजकीय स्वार्थ अधिक असल्याची भावना निर्माण होत आहे.
आंदोलनादरम्यान “सरकारला जाग कधी येणार?” असे फलक दाखविण्यात आले. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, सरकार जागरूक आहे म्हणूनच महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे. सरकारमध्ये सहभागी राहून विरोधाचे राजकारण करणे म्हणजे जनतेच्या विश्वासाशी खेळ करण्यासारखे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. सत्तेचा भाग असलेल्या व्यक्तींनीच सरकारबद्दल अविश्वासाचे वातावरण निर्माण करणे हे राज्याच्या आणि जनतेच्या हिताचे नाही. महाराष्ट्राच्या जनतेला आंदोलनाचे राजकारण नको आहे, तर विकास, पारदर्शकता आणि ठोस निर्णय अपेक्षित आहेत.
“सत्तेचे फायदे घ्यायचे आणि अडचणी आल्या की सरकारवर आरोप करायचे, ही भूमिका जनतेला मान्य होणार नाही. सरकारमध्ये सत्ता आणि रस्त्यावर विरोध हे दुटप्पी राजकारण महाराष्ट्रातील जनता ओळखून आहे.”
— महेश पाटील
भारतीय जनता पक्ष, पुणे.