पंचशील प्राथमिक व माध्यमिक प्रशालेत प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

पंचशील प्राथमिक व माध्यमिक प्रशालेत प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

KS News सोलापूर प्रतिनिधी राज लोखंडे 

सोलापूर, दि. १५ जून २०२६ :

"गरिबीमुळे कधीही मजबूर होऊ नका, तर परिस्थितीशी लढून मजबूत व्हा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आयुष्याचा मूलमंत्र बनवा," असे प्रेरणादायी प्रतिपादन राज्यसभेच्या खासदार मा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांनी केले.

मानवता विकास मंडळ संचलित पंचशील प्राथमिक व माध्यमिक प्रशालेत शैक्षणिक वर्षाच्या प्रथम दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांचे औक्षण, आरती व पुष्पवृष्टी करून आनंदात स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्रीशैलदादा नागनाथजी रणधिरे सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभेच्या खासदार डॉ. ज्योतीताई वाघमारे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते संस्थापक अध्यक्ष बुद्धवासी दलितमित्र नागनाथजी रणधिरे सर तसेच देशातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. ज्योतीताई वाघमारे म्हणाल्या की, शिक्षण हेच प्रगतीचे सर्वात मोठे साधन आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विद्यार्थ्यांनी मोठे ध्येय ठेवावे आणि यशासाठी सातत्याने प्रयत्न करावेत.

मार्च २०२६ मध्ये पंचशील माध्यमिक प्रशालेतून इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश व गोड खाऊचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक प्रियदर्शन साठे, नगरसेवक अजहर हुंडेकरी, नगरसेवक जहागीरदार साहेब, सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह अध्यक्षा सायरा शेख मॅडम, कसाब मुनाफ, समाजकल्याण अधिकारी आश्विनी मोरे मॅडम, संस्थेचे संचालक महेश भैया रणधिरे, संचालक सिद्धार्थ भैया रणधिरे, सामाजिक कार्यकर्ते योगेश भैया रणधिरे, पंचशील प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका महामाया ठोंबरे मॅडम, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक महालिंग एलगोंडे सर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब चटे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मिलिंद ठोंबरे सर यांनी मानले.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात आणि शिक्षणाचा नवा संकल्प घेऊन पंचशील प्रशालेतील प्रवेशोत्सव सोहळा संपन्न झाला.