पनवेल महानगरपालिकेत शिक्षण परिषदेचे आयोजन

पनवेल महानगरपालिकेत शिक्षण परिषदेचे आयोजन
पनवेल,दि.६: पनवेल महानगरपालिका आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक ५ जुलै २०२५ रोजी पनवेल महानगरपालिका शाळा क्र.१ लोकनेते दि.बा पाटील विद्यालय येथे पनवेल महानगरपालिकेच्या शाळांची शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. 
 
उपायुक्त प्रसेनजित कारलेकर व शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण  यांच्या मार्गदर्शनाखाली या शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्र समन्वयक अशफाक काझी , वाल्मीक राठोड  व वैभव पाटील तसेच पनवेल महानगरपालिका शाळांमधील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते.

 
बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रात घडणारे नवनवीन संशोधन व त्या अनुषंगाने विविध पैलूंवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली. यामधून शिक्षकांना नवनवीन माहिती व दिशा मिळाली. त्यानंतर उपशिक्षक वैभव चं. पाटील व ज्ञानेश आलदर यांनी अनुक्रमे इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले व वर्षभरात घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे नियोजन समजावून सांगितले . 
 
केंद्र समन्वय श्री. काझी यांनी शाळाबाह्य सर्वेक्षण अभियान व नवभारत साक्षरता अंतर्गत आवश्यक बाबी पूर्ण करण्याविषयी मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख श्री. राठोड  यांनी विविध समित्यांची रचना व कार्यपद्धती याविषयी माहिती दिली. केंद्रप्रमुख वैभव पाटील  यांनी  गुणवत्ता वाढ विकास प्रकल्प अंतर्गत वर्षभरात जे उपक्रम राबवले जाणार आहे त्याविषयी सखोल माहिती दिली.

 
 पनवेल महानगरपालिका शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी मार्गदर्शन करत असताना सर्वप्रथम शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांचे व शैक्षणिक दिनदर्शिका या उपक्रमाचे कौतुक केले.  मनपा शाळा क्र.०६ धाकटा खांदा शाळेतील उपशिक्षिका ज्योत्स्ना भरडा यांनी स्वखर्चाने ज्ञानरचनावादी वर्ग सजावट केल्याबद्दल त्यांचेही कौतुक केले. सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी वेळ काढून या वर्गास भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले. निपुण भारत व इयत्ता निहाय क्षमता अंतर्गत शिक्षकांनी करावयाची कार्यवाही याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. नवीन शैक्षणिक धोरण अभ्यासक्रम आणि प्रशासकीय बाबींविषयी  शिक्षकांना संबोधित केले. शासनाच्या विविध समित्या व त्याची कार्य पद्धती यांच्या विषयी सविस्तर माहिती दिली.
 
 महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी या परिषदेचे यशस्वी आयोजन महत्त्वाचे ठरले आहे.शिक्षण परिषदेच्या सुरुवातीला केंद्रप्रमुख  वैभव पाटील  यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची प्रस्तावना केली. उपशिक्षक सुजित म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
 
चौकट 
पनवेल महानगरपालिकेतील शाळांमध्ये गुणवत्तावाढी साठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
-श्री.रमेश चव्हाण , शिक्षणाधिकारी
पनवेल महानगरपालिका.