पनवेल,दि.६: पनवेल महानगरपालिका आयुक्त श्री. मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येतात.आषाढी एकादशीचे औचित्य साधून पनवेल महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये शनिवारी वृक्ष दिंडी व ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले.
या दिंडीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपणारा वारकरी पेहराव परिधान केला होता.यावेळी विठुरायाचे अभंग, ओव्या, फुगडी याबरोबरच वृक्ष संवर्धन व पुस्तकांचे महत्व यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. विद्यार्थ्यांसोबत ,शिक्षक व पालकांनीही या दिंडीत सहभाग घेतला होता.
अशा आगळ्या वेगळ्या दिंडीचे पनवेल नगरीत आयोजन केल्याबद्दल पनवेल मनपाचे उपायुक्त प्रसनजित कारलेकर व शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी समाधान व्यक्त करून सर्वांचे कौतुक केले.