पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड भाजपच्या वतीने ‘रक्तदान अमृत महोत्सव’ शिबिराचे आयोजन...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड भाजपच्या वतीने ‘रक्तदान अमृत महोत्सव’ शिबिराचे आयोजन...

पिंपरी :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष, पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने बुधवार दि.१७ सप्टेंबर २०२५ रोजी ‘रक्तदान अमृत महोत्सव’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड येथे होणार असून सकाळी ८ ते दुपारी ३ या कालावधीत संपन्न होणार आहे.
या शिबिराचे मुख्य संयोजक जयदीप खापरे असून नामदेव पवार आणि विनोद मालू सहसंयोजक आहेत. भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सार्वजनिक आरोग्य आणि सेवा यावर विशेष लक्ष असून त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम आयोजित केला आहे. अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे.”
या शिबिरामध्ये स्थानिक रुग्णालये व रक्तपेढ्यांच्या सहकार्याने रक्त संकलन केले जाणार आहे. रक्तदात्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, तसेच मोफत आरोग्य तपासणी यांचाही लाभ मिळणार आहे.

रक्तदान शिबिराच्या आयोजनामागचा उद्देश म्हणजे शहरातील रक्ताचा तुटवडा भरून काढणे आणि सामाजिक बांधिलकी जोपासणे, असे संयोजकांनी सांगितले. भाजपच्या विविध विभागांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.