धूळ प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर पनवेल महापालिकेची कठोर कारवाई

धूळ प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर पनवेल महापालिकेची कठोर कारवाई
पनवेल दि.5 : पर्यावरण प्रदूषणाच्या तक्रारीबाबत पनवेल महापालिका अत्यंत संवेदनशीलपणे हाताळत असून, दोषी आढळल्यास संबधितांवर कठोर कारवाई करत आहे. सिध्दार्थ मार्केट पनवेल येथे सुरू असलेल्या श्री समर्थ कृपा बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स यांच्या बांधकाम स्थळावरून मातीने भरलेले हायवा पंचरत्न ते उरण नाका येथील रस्त्यावरून येजा करत होते. या वाहतूकी दरम्यान वाहनांतून मोठ्या प्रमाणात रस्त्यावर माती सांडत होती. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ होत होती. याबाबत माहिती महापालिकेस मिळताच महापालिकेच्या घनकचरा व आरोग्य विभागाच्यावतीने माती वाहून नेणारे हायवा बंद करण्यात आले. तसेच रस्त्यावर पडलेली माती त्या संबधित विकासकाच्या कंत्राटदाराकडील कर्मचाऱ्यां द्वारे उचलून घेण्याचे निर्देश देण्यात आले. 

 
वायू व ध्वनी प्रदूषण विषयक नियमांनुसार बांधकाम साहित्य तसेच रेडी मिक्स काँक्रीट वाहून नेणारी सर्व वाहने पूर्णपणे वरच्या बाजूने व सर्व बाजूनी पूर्ण झाकलेली असावीत. वाहनातून कोणत्याही प्रकारे गळती होऊ नये तसेच ओव्हरलोड होऊ नये, ह्याची दक्षता संबधितानी घेणे आवश्यक आहे. अशा सूचना बांधकाम स्थळांना देण्यात आल्या आहेत.
 
 पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व आरोग्य विभागाच्यावतीने सातत्याने साफसफाई केली जात असते. परंतू काही कंत्राटदार अगर बांधकाम विकासक हलगर्जीपणामुळे शहरातील कचरा,धूळीमध्ये वाढ होताना आढळल्यास महापालिकेच्या वतीने अशा संबधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त मंगेश चितळे यांनी दिले आहेत. नागरिकांचे आरोग्य, स्वच्छ हवा व पर्यावरण संरक्षण याबाबत पनवेल महानगरपालिका कटिबद्ध असून , यापुढेही अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास कारवाई केली जाईल असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 
 
चौकट
महापालिकेच्या वतीने विविध बांधकाम प्रकल्पांवर स्थगितीची कारवाई
प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर महापालिका सातत्याने कारवाई करत असून आजपर्यंत 38 प्रकल्पांवरती स्थगतीची मोठी कारवाई करण्यात आली , तर 22 बांधकाम स्थळांना सात दिवसांची नोटीस देण्यात आली आहे. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार तसेच पनवेल महानगरपालिका आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार पनवेल महानगरपालिका हद्दीतील बांधकाम प्रकल्पांवर वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण व पर्यावरणीय नियमांच्या उल्लंघनाबाबत तपासणी करण्यात आली. स्थळ पाहणी अहवालानुसार आतापर्यंत एकूण 38 बांधकाम स्थळांवर कठोर कारवाई करण्यात आली असून सदर प्रकल्पांचे काम तात्काळ थांबविण्यात आले आहे.