पिंपळे गुरवमध्ये शेतकऱ्याने पाखरांसाठी सोडली ‘एकरभर ज्वारी’

पिंपळे गुरव :-स्मार्ट सिटी म्हणून ओळख निर्माण झालेल्या पिंपळे गुरवमध्ये सिमेंटच्या जंगलात आजही अनेकजण शेती करत आहेत. येथील शेतकरी रमेश तुकाराम जगताप यांनी त्यांच्या मालकीच्या एक एकर शेतामध्ये ज्वारीचे पीक घेतले असून, हे पीक पाखरांना खाण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे.
पिंपळे गुरव येथील साठ फुटी रस्त्यालगत भालेकरनगर परिसरातील रमेश जगताप यांनी आपल्या शेतात ज्वारीची पेरणी केली होती. शेतीला आधुनिकतेची जोड देत सेंद्रिय खताला प्राधान्य देऊन पेरणी केलेले ज्वारीचे पीक सध्या जोमात बहरले आहे. या ठिकाणी पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे.
१ एकर शेतामध्ये पक्ष्यांसाठी ज्वारी..
सध्या या सिमेंटच्या जंगलात काही मोजकेच शेतकरी शेती करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. मात्र, रमेश जगताप यांचे कुटुंबीय हे एक आगळावेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवून पशू-पक्ष्यांसाठी शेती जोपासली आहे. केवळ पशू-पक्ष्यांना पोटभर खाण्यासाठी ही शेती जोपासली असल्याचे जगताप कुटुंबीयांनी सांगितले.
ज्वारीच्या हिरव्या कणसांवर ताव..
ज्वारीचे पीक आता हुरड्याच्या अवस्थेत असून, कोवळ्या कणसावर पक्षी फेऱ्या मारू लागले आहेत. हिरव्यागार कणसातील हुरड्याचा आस्वाद घेण्यासाठी पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे.
सोन्याच्या जमिनीत लाखमोलाचे काम..
येथील हजारो चिमणी पाखरं अन्नपाण्यासाठी आलेली पाहावयास मिळत आहेत. एकीकडे जमिनीला सोन्याचा भाव आला आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्याने पाखरांसाठी जमीन सोडली आहे. जमिनीला सोन्यासारखा भाव आला असताना पक्ष्यांसाठी शेत सोडणे हे आजच्या जगात दुर्मीळ उदाहरण पाहायला मिळत आहे. जसजसे शहरीकरण मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे, तसतशी शहरातील शेतजमीन संपुष्टात येऊ लागली आहे.
आपल्या जीवनामध्ये पशुपक्षी व वृक्षांचे खूप महत्त्वाचे स्थान आहे. त्यांची जोपासना करणे गरजेचे आहे. या भावनेतून शेतातील ज्वारीचे पीक पाखरांना खाण्यासाठी ठेवले आहे. शेतातील कडबाही विकणार नसून तो गोशाळेसाठी देणार आहे.
– रमेश तुकाराम जगताप, शेतकरी, पिंपळे गुरव