पिंपरी चिंचवड शहरात अवैध गॅस भरणा केंद्रांचा सुळसुळाट – मोठ्या दुर्घटनेची भीती

पिंपरी चिंचवड शहरात अवैध गॅस भरणा केंद्रांचा सुळसुळाट – मोठ्या दुर्घटनेची भीती

पिंपरी, दि. 10 मार्च 2026 :

पिंपरी चिंचवड शहरात माळुंगे शिंदे वासुली, खालुंब्रे परिसरात अवैधरित्या गॅस भरणा केंद्रांचा सुळसुळाट झाल्याची माहिती समोर येत आहे. घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरमधून मशीनच्या सहाय्याने दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस भरला जात असल्याचे आढळून आले आहे.

या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गॅस भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान जर थोडासा निष्काळजीपणा झाला तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः माळुंगे, शिंदे वासुली व खालुंब्रे परिसरात अशा प्रकारची केंद्रे मागील काही महिन्यांपासून सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

या अवैध व्यवसायामुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होत असून प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक, महिला व ज्येष्ठ नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित प्रकरणाची माहिती तहसीलदार, गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलीस स्टेशनला देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

प्रशासनाने तातडीने या अवैध गॅस भरणा केंद्रांवर कारवाई करून संभाव्य दुर्घटना टाळावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.