महापालिका आयुक्तांना विविध आंबेडकरी संघटनांचा पाठिंबा

महापालिका आयुक्तांना विविध आंबेडकरी संघटनांचा पाठिंबा
अधिकाऱ्यांवरील अरेरावी व दादागिरीमुळे राजकीय कार्यकर्त्यांची बदनामी
 
पुणे – पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना आंबेडकरी चळवळीत कार्यरत विविध पक्ष, संघटनांचे प्रतिनिधी व आजी-माजी नगरसेवक यांनी भेट घेऊन ठाम पाठिंबा जाहीर केला. यावेळी शिष्टमंडळाने आयुक्तांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या कार्यशैलीचे समर्थन केले आणि पुणेकर नागरिक त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहतील, असा विश्वास व्यक्त केला.
 
गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या बैठकीमध्ये घुसून गोंधळ घातल्याच्या घटनेमुळे निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली. या घटनेचा निषेध करताना प्रतिनिधींनी म्हटले की, लोकप्रतिनिधी म्हणवून घेत कार्यकर्त्यांकडून बैठकीत धुडगूस घालणे हे अत्यंत लाजीरवाणे आहे आणि यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांची अनावश्यक बदनामी होत आहे.

 
शिष्टमंडळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) प्रदेश संघटन सचिव  परशुराम वाडेकर, माजी नगरसेवक अविनाश साळवे, रोहिदास गायकवाड, शैलेंद्र चव्हाण, राहुल डंबाळे, असित  गांगुर्डे, युवराज बनसोडे, माजी उपमहापौर सुनिता वाडेकर, हिमाली कांबळे आणि आंबेडकरी चळवळीतील इतर नेते सहभागी होते.

 
शिष्टमंडळाने यावेळी नमूद केले की, नवल किशोर राम हे प्रशासनात दीर्घ अनुभव असलेले अधिकारी असून त्यांनी बीड, छत्रपती संभाजीनगर  व पुणे जिल्ह्यात यशस्वी कारभार केला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी कोविड काळात केलेले कार्य व भीमा कोरेगावच्या दंगलीच्या वेळी दाखवलेले नेतृत्व पुणेकर विसरलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे आहे.
 
मनसेकडून झालेल्या प्रकारानंतर त्याला 'मराठी-अमराठी' वादाचा रंग देण्याचा प्रयत्न अत्यंत हास्यास्पद असल्याचे मतही शिष्टमंडळाने व्यक्त केले. आयुक्त राम हे उत्तम मराठी बोलतात व मराठी वाचक आहेत. ते अनेक वर्षांपासून स्थानिक कार्यकर्त्यांशी मराठीतून संवाद साधत आले आहेत. त्यामुळे भाषेच्या मुद्द्यावरून वाद निर्माण करणे म्हणजे मूळ विषयापासून लक्ष हटवण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका करण्यात आली.
 
या प्रकारात महाविकास आघाडीचे काही घटक मनसेच्या भूमिकेला समर्थन देत असल्याचे दिसल्याने आश्चर्य व्यक्त करत, अशा स्टंटबाजीला पाठिंबा देणे दुर्दैवी असल्याचेही शिष्टमंडळाने सांगितले.
 
"पुणेकर नागरिक महापालिका आयुक्तांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवतात व भविष्यातही ते त्यांच्या सोबत राहतील," असा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला. या घटनेचा अतिरिक्त आयुक्त मा. पृथ्वीराज यांच्या कडे तीव्र शब्दात निषेध  करण्यात आला.