'दगडूशेठ' गणपतीच्या दररोजच्या १ टन निर्माल्यापासून मिळते ३०० किलो खत

शेतकऱ्यांना होते मोफत खताचे वाटप : रोटरी क्लब ऑफ पुणे युवा च्या सहकार्याने उपक्रम
पुणे : गणेशोत्सव म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा उत्सव. पण या उत्सवात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य जमा होते. 'दगडूशेठ' गणपतीच्या चरणी भक्तीभावाने अर्पण केलेले फुले, हार, नारळ हे निर्माल्य शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद पेरत आहे. मागीस नऊ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ पुणे युवा या निर्माल्याला नवा अर्थ देत आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने १३३ व्या वर्षी गणेशोत्सव थाटात साजरा होत आहे. त्यामध्ये जमा होणारे निर्माल्य डीपी रस्त्यावरील जोशी किचन जवळ उभारलेल्या ‘निर्माल्य श्रेडिंग प्रकल्पा’त नेण्यात येते. तेथे निर्माल्याची पावडर करून त्याचे सेंद्रिय खत तयार केले जाते आणि ते खत विनामूल्य अन्नदाता शेतकऱ्याला दिले जाते.
दररोज १ टन निर्माल्यापासून साधारण ३०० किलो खत तयार केले जाते. यंदा या प्रकल्पाचे नववे वर्ष सुरू झाले. प्रकल्पाचे काम क्लबचे अध्यक्ष अविनाश डोईफोडे, सचिव दिनेश अंकम व प्रकल्प संयोजक मनोज धारप यांसह इतर सभासद करीत आहेत.
क्लबचे निनाद जोग म्हणाले, आम्ही मागील नऊ वर्षापासून हा प्रकल्प चालवत आहोत. या प्रकल्पात गणेशोत्सवात जमा होणारे निर्माल्य घेऊन येतो आणि त्या निर्माल्यापासून खत तयार करतो. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे यामध्ये मोठे सहकार्य यामध्ये मिळते. उत्सवात दररोज सकाळी नऊ ते दहा च्या दरम्यान टेम्पो त्यांच्याकडे पोहोचतो आणि साधारण वीस पोती म्हणजे साधारण १ टन निर्माल्य ते आम्हाला दररोज देतात. यापासून साधारण ३०० ते ४०० किलो खत तयार होते आणि गरजू शेतकरी, सोसायट्यांना त्याचे खत दिले जाते.