भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्रतर्फे प्रमुख जिल्हा न्यायाधीश अरविंद वानखेडे यांचा सन्मान
पुणे : भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्र राज्याच्या वतीने प्रमुख जिल्हा न्यायाधीश पुणे मा. अरविंद तोताराम वानखेडे यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ॲड. कैलासराव पठारे-पाटील, उपाध्यक्ष ॲड. पांडुरंग ढोरे-पाटील यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सन्मान स्वीकारताना मा. वानखेडे यांनी बार आणि बेंच यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी तसेच पक्षकारांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी मीडिएशन व लोकन्यायालयांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमास महासचिव ॲड. योगेश तुपे-पाटील, ॲड. हेमंत भांड-पाटील, ॲड. मयूर माळी, ॲड. सुरेखा बांदल, ॲड. ओंकार सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्रासह देशातील २३ राज्यांत कार्यरत असून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव व सन्मान करत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मा. वानखेडे यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.