राष्ट्रीय पुरस्कार विजेता बालकलाकार कु. कबीर शशि खंदारेचा गनिमी कावा युवा सेवा संघटनेतर्फे भव्य सत्कार व मिरवणूक
पुणे प्रतिनिधी : मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद क्षण! सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्यासोबत काम केलेला बालकलाकार कु. कबीर शशि खंदारे याने ‘जिप्सी’ या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार हा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, दिल्ली येथे नुकताच हा मानाचा पुरस्कार कबीरला प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, हा बालकलाकार पुण्यातील अप्पर भागातील रहिवासी असून संपूर्ण शहराचा अभिमान ठरला आहे.
भव्य मिरवणूक व उत्स्फूर्त स्वागत
या ऐतिहासिक यशाबद्दल गनिमी कावा युवा सेवा संघटनेतर्फे दिनांक २७ रोजी कबीरचा सत्कार करण्यात आला. यावेळी कबीरच्या गौरवासाठी फुलांच्या वर्षावात आणि जयजयकारात भव्य मिरवणूक काढण्यात आली. परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कबीरवर प्रेमाचा वर्षाव केला.
मान्यवरांची उपस्थिती
सदर सोहळ्याला गणेश शेठ मोहिते, सुरेशजी ओहाळ, दस्तगीर भाई शेख, मच्छिंद्रजी बनसोडे, विलासजी शिंदे, वनराजजी शेलार, प्रदीपजी कांबळे, सीमाताई बारड, जयश्रीताई जाधव, वंदनाताई जाधव, छायाताई हातेकर यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच संघटनेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
या प्रसंगी गनिमी कावा युवा सेवा संघटनेचे संस्थापक संजय वाघमारे म्हणाले, “बालकलाकार कबीरची कामगिरी ही प्रेरणादायी आहे. महाराष्ट्रातील तरुणाईला दिशा देणारी आहे. गनिमी कावा संघटना नेहमीच अशा गुणवंतांचा सन्मान करीत राहील.”
कार्यक्रमात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, गनिमी कावा युवा सेवा संघटनेचे अध्यक्ष संजयभाऊ यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांच्या सक्रिय नेतृत्वामुळे हा सोहळा यशस्वी पार पडला. उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी त्यांचे मनापासून कौतुक केले.
या राष्ट्रीय यशामुळे मराठी चित्रपटसृष्टीसोबतच संपूर्ण महाराष्ट्राचा मान उंचावला असून, कबीर शशि खंदारे वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.