चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सराफाला निगडी पोलिसांकडून अटक; १३ लाख ५७ हजारांचे दागिने जप्त..

पिंपरी:-
निगडी पोलिसांनी तब्बल २५० किलोमीटर अंतर सीसीटीव्ही कॅमेरे तपासून चेन स्नॅचिंग करणाऱ्या एका सराईत चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सराफ व्यावसायिकालाही अटक करण्यात आली आहे. या दोघांकडून पोलिसांनी १३ लाख ५७ हजार २०० रुपये किमतीचे १५१ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
उमेश सुरेश पेहरकर (३१, रा. टाकली सागज, वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि बाळासाहेब भागवत उदावंत (रा. वैजापूर, छत्रपती संभाजीनगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्या तीन साथीदारांचा शोध सुरू आहे.
पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० फेब्रुवारी रोजी आकुर्डी येथे एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावले. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान, पोलिसांनी चोरांच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. चोरीनंतर त्याच दिवशी आरोपींनी पुण्यातील हडपसर भागात आणखी एक ठिकाणी दागिने हिसकावले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अहिल्यानगर जिल्ह्यातील तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतही अशीच दुसरी चोरी केली.
निगडी पोलिस हडपसरमार्गे अहिल्यानगर जिल्ह्यात तपासाचा पाठलाग करत नेवासापर्यंत पोहोचले. अखेर सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटली. वैजापूर येथे तीन दिवस सापळा रचून उमेश पेहरकरला अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान, त्याने निगडी, हडपसर आणि तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत दागिने हिसकावल्याचे उघड केले. चोरी केलेले सर्व दागिने त्याने वैजापूर येथील एका सराफ व्यावसायिकाला विकल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी त्या सराफालाही ताब्यात घेतले. तपास निगडी पोलिस करत आहेत.
ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शत्रुघ्न माळी, पोलिस निरीक्षक भोजराज मिसाळ, सहायक पोलिस निरीक्षक अंबरीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस कर्मचारी भगवान नागरगोजे, सिद्राम बाबा, दत्तात्रय शिंदे, शिवाजी नागरगोजे, स्वप्निल पाचपिंडे, विनायक मराठे, दीपक पिसे, सुनील पवार, प्रवीण बांबळे, केशव चेपटे आणि नूतन कोंडे यांनी केली.