जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकातील 'मातृशक्ती नर्सिंग पॉड' चे लोकार्पण..

राज्यमंत्री मेघना दिपक साकोरे - बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन
 
पुणे, प्रतिनिधी - सध्या पुणे मेट्रोने दैनंदिन प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये वाढ होत आहे. महिलांबरोबर त्यांची लहान मुले देखील प्रवास करीत असतात. बऱ्याच वेळेला स्तनपान देणाऱ्या मातांना प्रवासादरम्यान आपल्या बाळाला स्तनपान देण्यासाठी किंवा बाळाचे कपडे बदलण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही, अश्या वेळी महिलांना अनेक प्रकारच्या समस्या भेडसावत. अश्या मातांसाठी पुणे मेट्रोने आता 'मातृशक्ती नर्सिंग पॉड' म्हणजेच स्तनपान कक्ष सुरु केले आहेत. इवोलेंट हेल्थ इंटरनॅशनल प्रा. लि यांच्या विद्यमाने सीएसआर उपक्रमांतर्गत सोशल थम फाऊंडेशनच्या सहयोगाने पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक येथे 'मातृशक्ती नर्सिंग पॉडचे' लोकार्पण सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना दिपक साकोरे - बोर्डीकर यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी पुणे मेट्रोचे संचालक (कार्य) अतुल गाडगीळ, महाव्यवस्थापक कॅप्टन डॉ. राजेंद्र सनेर-पाटील, सोशल थंबच्या संस्थापिका अनुश्री जवंजाळ तसेच फाउंडेशनचे पवन पटेल, अमृता उबाळे, अमोल करंबे, ध्यानगुरू रघुनाथजी येमूल, इवोलेंट हेल्थ इंटरनॅशनल प्रा. लि आणि मेट्रोचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 
“लहान बाळांसह प्रवास करणाऱ्या मातांसाठी मेट्रोसारखी सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक समावेशक बनविण्यासाठी हि एक सुरुवात आहे. पुणे मेट्रो स्थानकांवर मातृशक्ती आता उपलब्ध झाल्यामुळे अनेक महिलांचे आयुष्य अधिक सुलभ होईल, याचा मला अतिशय आनंद आहे,” असे सोशल थंबच्या संस्थापिका अनुश्री जवंजाळ यांनी सांगितले.