ठाणे महापालिका क्षेत्रात अग्निशमन सेवा सप्ताहास आरंभ

ठाणे महापालिका क्षेत्रात अग्निशमन सेवा सप्ताहास आरंभ
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी वाहिली शहिदांना श्रद्धांजली
ठाण्यात विविध ठिकाणी होणार प्रात्यक्षिके
 
                ठाणे (१४) - अग्निशमन दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने सेवा सप्ताह आयोजित केला आहे. या सप्ताहाचा आरंभ शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून सोमवारी सकाळी करण्यात आला. त्या निमित्ताने ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी बाळकूम अग्निशमन केंद्र येथे शहीद स्तंभाला अभिवादन केले. 
 
              याप्रसंगी ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त (अग्निशमन विभाग) दिनेश तायडे, उपायुक्त शंकर पाटोळे, अग्निशमन दलाचे प्रमुख गिरीश झळके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी आदी उपस्थित होते. याचवेळी, महाराष्ट्र फायर सर्व्हीस असोसिएशनच्या देणगी पेटीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
 
               दि. १४ एप्रिल, १९४४ रोजी मुंबई बंदरात उभ्या असलेल्या बोटीतील दारुगोळ्याने अचानक पेट घेतला. त्याठिकाणी उसळलेल्या भीषण आगीशी झुंज देत असताना झालेल्या भीषण स्फोटामुळे मुंबई अग्निशमन दलाचे ६६ अधिकारी आणि जवान शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ अग्निशमन दिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने, १४ एप्रिल ते २० एप्रिल या काळात ठाणे अग्निशमन दलातर्फे महापालिका क्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात, विविध आस्थापना, सोसायटी येथे अग्निसुरक्षेबाबतची प्रात्यक्षिके करण्यात येणार आहेत.