६०० पेक्षा अधिक विद्यार्थी व पालकांची उपस्थिती
पुणे :
दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिकाई) यांच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली भव्य चित्रकला स्पर्धा रमणबाग न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथे अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेत विविध वयोगटांतील ६०० पेक्षा अधिक दिव्यांग विद्यार्थी तसेच त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेदरम्यान दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून, रंगसंगतीतून आणि चित्रकलेतील कौशल्यातून निसर्ग, सामाजिक विषय, स्वप्ने आणि आत्मविश्वास यांचे प्रभावी चित्रण केले. त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा आणि सर्जनशीलतेला चालना मिळावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास महाराष्ट्र सायबर विभाग, मुंबई येथील पोलीस उपमहानिरीक्षक (IPS) संजय शिंत्रे, ज्येष्ठ चित्रकार व शिल्पकार प्रमोद कांबळे, डिकाई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ध्यानगुरु रघुनाथ येमुल गुरुजी, रमणबाग न्यू इंग्लिश स्कूलचे उपमुख्याध्यापक जयंत टोले, डिकाई संस्थेचे सचिव शेखर यादव तसेच समन्वयक प्रशांत मोहोळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठ कलाकार प्रमोद कांबळे यांनी एकाग्र चित्त, सातत्यपूर्ण सराव आणि सर्जनशील दृष्टीकोनातून चित्रकला व शिल्पकलेत यश कसे मिळवता येईल, याविषयी मार्गदर्शन केले. तसेच या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केल्यास त्यांना कालेत करिअर करण्यासाठी मार्गदर्शन करू असे कांबळे यांनी सांगितले.
कार्यक्रमात बोलताना ध्यानगुरु रघुनाथ येमुल गुरुजी यांनी सांगितले की, “दिव्यांग विद्यार्थ्यांच्या रंगांतून त्यांचा आत्मविश्वास, जिद्द आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्ने स्पष्टपणे व्यक्त होताना दिसतात.”
डिकाई संस्थेतर्फे लवकरच एक डिजिटल पोर्टल सुरू करण्यात येणार असून, या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कला-कौशल्य विकासासाठी मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच डिकाई तर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षण व उच्च शिक्षणासाठी तीन विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा संकल्पही यावेळी जाहीर करण्यात आला.
चौकट
सोशल मीडिया आणि लहान मुले सायबर चोरट्यांचे सॉफ्ट टार्गेट - संजय शिंत्रे, पोलीस उपमहानिरीक्षक, सायबर सेल महाराष्ट्र
दिव्यांग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राज्याच्या सायबर सेलचे पोलिस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे म्हणाले की, सोशल मीडिया आणि लहान मुलांच्या माध्यमातून सायबर चोरटे आपले टार्गेट निश्चित करत असल्याचे निरीक्षण आहे. सोशल मिडियावर दिसणाऱ्या बहुतांश जाहिराती या फसव्या आहेत, तसेच अनेकदा आपण कोणतीही चाचपणी न करता सोशल मीडिया किंवा नया अॅप च्या अटी स्वीकारतो ते धोकादायक आहे. लहान मुले विविध गेम्स खेळत असत्तात त्यावेळी येणाऱ्या जाहिराती, लिंक किंवा मेसेजच्या माध्यमातून सायबर चोरटे, गुन्हेगार तुमच्या मोबाईल मध्ये व्हायरस सोडतात व तुमची माहिती काढतात असे दिसते, यामुळे सोशल मिडियाचा वापर आणि लहान मुलांच्या हातात मोबाइल देताना काळजी घ्या असे अवहान केले.