किरण साळी मित्र परिवार आणि ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र च्या वतीने आयोजन ; भारतीय लष्कराला ७०० हून अधिक ढोल-ताशा वादनातून मानवंदना
पुणे : भारत माता की जय... वंदे मातरम चा जयघोष... एकाच वेळी ७०० हून अधिक ढोल ताशांचे वादन... देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण... रणवाद्यांचे वादन... आणि पाच वीर पत्नीचा हृदयस्पर्शी सन्मान सोहळा अशा देश प्रेमाने भारलेल्या वातावरणात भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम करण्यात आला. स्वातंत्र्यदिनी पुण्यात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या 'तिरंगा फेस्टिवल' मध्ये एक हजारहून अधिक वादक आणि पाच ते सहा हजारहून अधिक पुणेकरांनी सहभाग घेतला.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय लष्करातील सैनिकांना व त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याच्या उद्देशाने श्री जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर चौकाजवळ, छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर 'तिरंगा फेस्टिवल २०२५' चे आयोजन करण्यात आले. किरण साळी मित्र परिवार आणि ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र च्या वतीने हा फेस्टिवल घेण्यात आला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सेनाधिकारी पद्मश्री मुरलीकांत पेटकर, राजेश पांडे, मेघराज भोसले, आयोजक किरण साळी, संजय सातपुते, आनंद सराफ, ऍड. शिरीष थिटे, माजी नगरसेवक सुशील मेंगडे, श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत बहिरट पाटील आदी उपस्थित होते.
देश रक्षणार्थ प्राणांची बाजी लावणा-या भारतीय सैनिकांच्या पाच वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये वीरपत्नी मीनाक्षी भिसे, राणी चौधरी, सुस्मिता पालेकर, प्रतिभा खटके, दिपाली मोरे यांचा समावेश होता. तिरंगी उपरणे आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित गौरव झाला.
डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, भारत देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या सैनिकांच्या वीर पत्नींसोबत आपण आहोत, हा विश्वास देणारा हा कार्यक्रम आहे. प्रत्येक सणाला आपण सैनिकांच्या कुटुंबांसोबत असायला हवे. ढोल ताशा वादन हे सर्वत्र होत असून याला लवकरच चांगला दर्जा व उंची मिळेल.
ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र अंतर्गत असलेल्या ढोल ताशा पथकांतील ७००हून अधिक वादकांनी एकत्रितपणे वाद्यवादन केले. ढोल ताशाच्या वादनातून 'आॅपरेशन सिंदूर' व 'आॅपरेशन महादेव' मधील वीरांना मानवंदना देण्यात आली. विविध वाद्यांचा सुरेल अविष्कार असलेला 'नादरंग' -तालवाद्यकचेरी हा कार्यक्रम सादर झाला. याशिवाय 'वंदे मातरम' या स्वर मैफलीतून बालकलाकारांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. तसेच गीततिरंगा/ रामराज्याभिषेक भरतनाट्यम नृत्यावर आधारित सादरीकरण झाले. केशव शंखनाद पथकाने देखील शंख वादन केले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त सामुदायिक पसायदानाने फेस्टिवलची सांगता झाली. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावून स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
* फोटो ओळ : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय लष्करातील सैनिकांना व त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याच्या उद्देशाने श्री जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर चौकाजवळ, छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर 'तिरंगा फेस्टिवल २०२५' चे आयोजन करण्यात आले. किरण साळी मित्र परिवार आणि ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र च्या वतीने हा फेस्टिवल घेण्यात आला.