महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी लवकरच सरकारी जागा देणार - अजितदादा पवार

महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी लवकरच     सरकारी जागा देणार - अजितदादा पवार

                 मंगळवेढा :- महाराष्ट्र सरकारच्या वतीने मंगळवेढ्यात जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचे स्मारक निर्मितीसाठी लवकरच शासकीय जागा देण्याची कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली.यासाठी तात्काळ कार्यवाहीचे आदेश त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले आहेत.
               महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डाॅ.बसवराज बगले यांनी मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक निर्मितीसाठी मागील 9 वर्षांपासून सततचा प्रशासकीय पाठपुरावा चालू ठेवला आहे. कृषी विभागाच्या जागेत कृषी पर्यटन केंद्र करून त्याचाच एक भाग म्हणून स्मारक उभारण्याचा प्रयत्न झाला.मात्र ती जमीन बीज गुणन प्रक्षेत्राची असल्याने कोणत्याही सार्वजनिक उपक्रमासाठी देता येत नाही असा शासन निर्णय आहे.त्यामुळेच डाॅ.बगले आणि कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून कृष्ण तलावाची शासकीय जमीन बसवेश्वर स्मारकासाठी वर्ग करण्याची विनंती शासनाकडे केली आहे.
               मंगळवेढ्यातील कृष्ण तलावालगतची जमीन या स्मारकासाठी खूप उपयुक्त असून ती जागा देण्याबाबत निर्णय घेण्याचा सकारात्मक अहवाल तहसिलदार आणि प्रांताधिकारी यांनी विहित नमुन्यात सादर केला आहे.मात्र मागील 3 वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाने कागदी घोडे नाचवून सदरचा प्रस्ताव प्रलंबित ठेवला आहे.त्यामुळेच स्मारक निर्मितीसाठी डाॅ.बसवराज बगले यांनी बसवजयंती पासून सोलापुरात आमरण अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.यासंबधीची पूर्वसूचना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री जयकुमार गोरे,जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पोलीस प्रशासनाला दिली आहे.त्या पार्श्वभूमीवर अजितदादांची आणि पालकमंत्र्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादांनी तात्काळ जिल्हाधिकारी आशीर्वाद यांना बोलून शासकीय जमीन स्मारकाला देण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार पालकमंत्री गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभाग प्रमुखांची बैठक सोमवारी 22 एप्रिल 25 रोजी पंढरपुरात पार पडली.यासाठी लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मुंबईत व्यापक बैठक घेण्याची हमी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
              जिल्हाधिकारी यांचा अहवाल विभागीय आयुक्तालयाकडून मिळताच सरकारी जमीन बसवेश्वर स्मारकासाठी वर्ग करण्याची कार्यवाही केली जाईल.आणि बसवजयंती पूर्वी बसवप्रेमी लिंगायत समाजाची ही मागणी मार्गी लावण्यात येईल असा विश्वासही पालकमंत्री गोरे यांनीही दिली.
● स्मारकाचा आराखडा करा - जिल्हाधिकारी.
                मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याच्या अनुषंगाने कृष्ण तलाव परिसरात जल पर्यटन,अनुभव मंटप,सभामंडप, प्रार्थनागृह,वचन साहित्य भांडार,ध्यानगृह,शिल्पकला दालन,चित्रमय बसवचरित्र दर्शनमंटप,पर्यटक निवास, वाचनालय व ग्रंथालय,सांस्कृतिक भवन,कलादालन,आरोग्य सुविधा,कारंजे,कृष्ण तलावात लोकवर्गणीतून महात्मा बसवेश्वरांचा पुतळा,नौका विहार,आदींचा समावेश असणारे आंतरराष्ट्रीय स्मारक तात्काळ उभारावे यासाठीचा कृती आराखडा डाॅ.बसवराज बगले यांनी शासनाला आणि सोलापूरच्या जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे.या सर्व उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी प्रथम तलावासह 15 हेक्टर  सरकारी जमीन स्मारक समितीकडे वर्ग करा अशी अनेक निवेदने दिली आहेत.
             त्यानुसार स्मारकाचा व्यापक आराखडा तयार करून संबधित विभागाचे ना हरकत दाखले घ्यावेत आणि प्रशासकीय कार्यवाही गतिमान करावी अशी सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल प्रशासनाला दिले आहेत.डाॅ.बगले यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरील महसूल प्रशासन सक्रीय झाले असून महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या विषयाला गती आल्याचे चित्र दिसत आहे.
             यासाठी आमदार डाॅ.विनय कोरे,आमदार समाधान आवताडे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संतोष पवार,जिल्हा सरचिटणीस ॲड.शिवानंद पाटील,सिध्देश्वर कोरे,आनंद मुस्तारे,तुकाराम कुदळे,शुभम लिगाडे,संतोष मोगले आदि पदाधिकारी पाठपुरावा करीत आहेत.