महाराष्ट्र शासनाच्या जनकल्याण यात्रा 2025 चे ठाणे जिल्ह्यात उत्साहात स्वागत

महाराष्ट्र शासनाच्या जनकल्याण यात्रा 2025 चे ठाणे जिल्ह्यात उत्साहात स्वागत
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने यांच्या उपस्थितीत झाले यात्रेचे स्वागत
 
     ठाणे,दि.11(जिमाका):- राज्याच्या विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने “जनकल्याण यात्रा 2025” चे आयोजन राज्यभर करण्यात आले आहे. या यात्रेच्या माध्यमातून विशेष सहाय्य विभागाच्या सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम मोबाईल एलईडी व्हॅनमार्फत राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये करण्यात येत आहे. या जनकल्याण यात्रेचा शुभारंभ विशेष सहाय्य विभागाचे मंत्री श्री.नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते नुकताच दिंडोरी, नाशिक येथे संपन्न झाला आहे.
     जनकल्याण यात्रेचे राज्यभर कार्यक्रम होत असून ठाणे जिल्ह्यामध्ये आज ही जनकल्याण यात्रा पोहोचली असून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
     या यात्रेचे स्वागत निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) हरिश्चंद्र पाटील, तहसिलदार (संजय गांधी योजना) संदीप थोरात, तहसिलदार मिरा-भाईंदर निलेश गौड व इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले.
     यावेळी विशेष सहाय्य विभागाच्या योजनांवर आधारित दिग्दर्शक व निर्माता शंकर बारवे यांनी तयार केलेला माहितीपट मोबाईल एलईडी व्हॅनद्वारे दाखविण्यात आला. त्याचबरोबर योजनेची माहितीपत्रके लाभार्थ्यांना देऊन योजनेची माहिती देण्यात आली. या यात्रेदरम्यान मोबाईल एलईडी व्हॅनच्या माध्यमातून विशेष सहाय्य विभागाच्या योजनांची माहिती ठाणे जिल्ह्यातील सर्वसामान्यांपर्यंत सर्वदूर पोहोचविण्यात येणार आहे.
     विशेष सहाय्य विभागाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना या सहा मुख्य योजना राज्य शासन व केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना आहेत.
     त्याचप्रमाणे लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टल द्वारे लाभाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्याचे स्वतःचे बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी संबंधित तहसील कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन विशेष सहाय्य विभागाचे मंत्री श्री.नरहरी झिरवाळ यांनी लघुपटाच्या माध्यमातून केले आहे.