मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. "उद्या माझा वाढदिवस आहे. यावर्षी कार्यकर्त्यांनी कोणताही उत्सव साजरा करू नये," असे स्पष्ट करत त्यांनी कार्यकर्त्यांना केक न कापण्याचे, फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे.
त्याऐवजी, भारतीय सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी व पाकिस्तानच्या गोळीबारात शहिद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आणि राज्यात 'तिरंगा रॅली' काढण्याचे आवाहन केले आहे.
या 'तिरंगा रॅली'चा मुख्य उद्देश, भारतीय सशस्त्र दलांचे मनोबल वाढवण्यासाठी आहे, असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
या रॅलीत "भारत झिंदाबाद''च्या घोषणा देण्याची सूचना त्यांनी केलीय.
प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस १० मे रोजी साजरा केला जातो. राज्यभरात हा दिवस 'स्वाभिमान दिवस' म्हणून साजरा केला जातो.
यंदा भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. हा निर्णय भारतीय सैन्य, शहीद जवानांविषयी असलेल्या आदराचे, त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.