"रंगानुभूति: पूर्वरंग ते उत्तररंग नाट्य प्रयोग कला महोत्सवाला रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद

"रंगानुभूति: पूर्वरंग ते उत्तररंग नाट्य प्रयोग कला महोत्सवाला रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद

पिंपरी, पुणे (दि. २० सप्टेंबर २०२५) उदयन्मुख कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी नाट्यमहोत्सवातून संधी मिळाली आहे. पिंपरी चिंचवड शहराची आता सांस्कृतिक ओळखही निर्माण झाली असून अनेक कवी, लेखक, साहित्यिक, अभिनेते घडले आणि घडत राहतील. यामुळे शहराचा नावलौकिक वाढवला आहे. सरकार म्हणून सांस्कृतिक, कला, साहित्य क्षेत्राला शक्यतो सर्व मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने या महोत्सवाला मदत करून कला, संस्कृती जोपासण्यास हातभार लावला आहे, असे मत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी व पैस कल्चरल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "रंगानुभूति: पूर्वरंग ते उत्तररंग नाट्य प्रयोग कला महोत्सव २०२५" औपचारिक उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त आणि महोत्सवाचे निमंत्रक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपायुक्त पंकज पाटील, तृप्ती सांडभोर, राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे प्रमुख प्रवीण भोळे, मनपाचे विशेष अधिकारी किरण गायकवाड, संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, पैस रंगमंच व थिएटर वर्कशॉप कंपनीचे संस्थापक प्रभाकर पवार, समन्वयक अमृता ओंबळे आदी उपस्थित होते. 


     पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने २०१३ मध्ये कला क्रीडा धोरण निश्चित केले असून स्थानिक कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. शहरातील विविध शाळांमध्ये संगीत, कला, नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. या माध्यमातून शहराच्या सांस्कृतिक वैभवात वाढ होत आहे. रंगानुभूती नाट्य महोत्सवात महाराष्ट्रसह राजस्थान, केरळ, पश्चिम बंगाल, कर्नाटक आदी राज्यांतील कलावंत सहभागी झाले असून त्यांची कला पाहण्याची संधी पिंपरी चिंचवडकरांना उपलब्ध झाली आहे. दरवर्षी अशाप्रकारचा महोत्सव आयोजित केला जाईल, असे शेखर सिंह यांनी सांगितले.


    यावेळी पिंपरी चिंचवड परिसरातील नाट्य, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यरत, दिशा सोशल फाऊंडेशन, टेल्को कलासागर, अखिल भारतीय नाट्य परिषदेची पिंपरी चिंचवड शाखा, अथर्व थिएटर, कलापिनी तळेगाव दाभाडे, नाटक घर, द बॉक्स, आसक्त, महाराष्ट्र कल्चरल सेंटर सुदर्शन रंगमंच, संस्कार भारती या संस्थांचा "प्रयोग कला सन्मान" देऊन गौरविण्यात आले.
सूत्रसंचालन मिलिंद बावा, तेजस्विनी गांधी कुलकर्णी यांनी केले. अमृता ओंबळे यांनी आभार मानले.