राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा रॅली संपन्न

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा रॅली संपन्न
पुणे, दि.२९ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) :- भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व हॉकीचे जादूगार मे. ध्यानचंद यांच्या जन्मदिनी 29 ऑगस्ट रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना व चॉईस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न झाला. तसेच गोळीबार मैदान ते सेव्हन लव्हज चौक मार्गे ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, गंज पेठ दरम्यान क्रीडा रॅली आयोजित करण्यात आली.

 

 
 
क्रीडा रॅलीस जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे व प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी ताहेर अस्सी, यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. यावेळी श्री. लकडे यांनी आपले विचार व्यक्त केले. या जनजागृती प्रभात फेरीत पूना कॉलेज व परिसरातील 20 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील जवळपास 1 हजार खेळाडू व क्रीडाप्रेमी यांनी सहभाग घेतला. या जनजागृती प्रभात फेरीत मोलेदिना हायस्कूल, माउंट कार्मेल हायस्कूल, क्रिसेंट हायस्कूल, एस.एम.जोशी हिंदी हायस्कूल, अंजुमन ए इस्लाम हायस्कूल, सावित्रीबाई फुले हायस्कूल, लेडी हवाबाई हायस्कूल इ. अनेक शाळेतील 500 विद्यार्थ्यांनी बैंड पथक, झांज पथक, लेझीम पथक तसेच क्रीडाविषयक प्रात्यक्षिके सादर करून सहभाग नोंदवला. सरदार दस्तुर मुलांच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रोड स्केटींगची प्रात्यक्षिकेही सादर केली.
 
 
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात शैक्षणिक व शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील शिक्षक, क्रीडाक्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल प्राचार्य आफताब अन्वर, श्री. लकडे, श्री. आसी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम व सुरक्षा प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.