वनराई इको क्लबतर्फे भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न

वनराई इको क्लबतर्फे भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न
 संभाजी उद्यान विद्यार्थ्यांच्या चित्रांनी रंगून गेले
 
पुणे: वनराई इको क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आंतरशालेय पर्यावरण विषयक चित्रकला स्पर्धा काल छत्रपती संभाजी महाराज उद्यान, बालगंधर्व रंगमंदिर परिसरात उत्साहात पार पडली. या स्पर्धेत पुणे शहरातील एकूण ५० शाळांमधील १२० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन वनराई सचिव अमित वाडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्व सांगत उद्बोधनपर मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. पर्यावरण जतन आणि संवर्धनासाठी विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

वनराई पर्यावरण शिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक बसवंत विठाबाई बाबाराव यांनी इको क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती निर्माण करण्याची महत्वाची भूमिका अधोरेखित केली. तसेच उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे स्वागत केले.
स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना वनराईतर्फे रंग, ब्रश, ड्रॉइंग शीट, पेन्सिल, खोडरबर व शार्पनर देण्यात आले. सकाळी १० ते ११:३० या वेळेत विद्यार्थी चित्रकलेत मग्न होते. पर्यावरण, जैवविविधता, शाश्वत शेती, नद्या व हरित शाळा या विषयांवर आधारित अनेक सुंदर चित्रांनी संभाजी उद्यानाचे संपूर्ण वातावरण रंगून गेले होते.

सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या अनेक नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या चित्रांचे आणि त्यांच्या शाळांचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व पर्यावरण विषयक जाणिवेला नागरिकांकडून विशेष दाद मिळाली.
येत्या फेब्रुवारी महिन्यात पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी साकारलेल्या निवडक चित्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती वनराईतर्फे देण्यात आली.
ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत संवेदनशीलता निर्माण करणारी आणि सर्जनशीलतेला चालना देणारी ठरली, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.