सक्षमा प्रकल्पातील महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन मेळावा संपन्न..

सक्षमा प्रकल्पातील महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन मेळावा संपन्न..
पिंपरी :-सक्षमा प्रकल्पाअंतर्गत शहरातील सक्रीय महिला बचत गटांना प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येत आहे. याशिवाय त्यांना मालमत्ता कर संकलन, नवी दिशा, अग्नि सुरक्षा सर्वेक्षण यांसारख्या महापालिकेच्या विविध उपक्रमात सहभागी करून घेऊन रोजगार उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा मानस आहे. तसेच बचत गट मॉल यांसारख्या संकल्पना राबवून त्यांना कायमस्वरूपी स्वत:चा हक्काचा व्यवसाय सुरू करून देणे हा यामागचा उद्देश आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हस ट्रस्ट (टाटा स्ट्राइव्ह) यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांसाठी सक्षमा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात सहभागी महिला बचत गटांसाठी महिला दिनाचे औचित्य साधून पिंपरी कॉलनी येथे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाजवळील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे महिला मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
 
याप्रसंगी माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी नगरसदस्या सुजाता पालांडे, उषा मुंडे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, प्रशासन अधिकारी पुजा दूधनाळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, टाटा स्ट्राईव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय वंजारी, टाटा मोटर्स गृहिणी प्रकल्प अध्यक्षा शिल्पा देसाई, सीएसआर प्रमुख अमिता जाधव, सल्लागार अनिता राजन तसेच महापालिका कर्मचारी आणि सक्षमा प्रकल्पातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले, शहरामध्ये सध्या १५ हजारांपेक्षा जास्त महिला बचत गट आहेत. त्यामधील सुमारे ४ हजार ५०० महिला बचत गट सक्रीय आहेत. या महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महापालिकेने टाटा स्ट्राईव्हसोबत करार केला आहे. या कराराअंतर्गत सक्षमा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात आहे. याशिवाय या प्रकल्पामध्ये अधिकाधिक महिला बचत गटांना सामिल करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. महिला बचत गट ठराविक पातळीच्या क्षमतेच्या पलीकडे जात नाहीत. त्यांना आधुनिक जगाशी स्पर्धा करायची असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान त्यांना असणे आवश्यक आहे. व्यावसायिक क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या युगात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करायचे असेल तर उत्पादनांची गुणवत्ता टिकवून ठेवणे गरजेचे आहे. उत्पादनांची गुणवत्ता टिकवून ठेवायची असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा आहे. या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण तसेच महिलांना व्यावहारिक व आर्थिक ज्ञान देण्यासाठी सक्षमा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे.
 
प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी विविध बड्या कंपन्यांसोबत भागीदारी करण्यासाठी देखील महापालिका सहकार्य करणार आहे. याशिवाय येत्या काही दिवसात महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणारे बॅग, वह्या, रेनकोट आदी साहित्य बनविण्याचे काम या महिला बचत गटांना देण्याचा महापालिकेचा मानस आहे. यासाठी महिला बचत गटांनी साहित्याची गुणवत्ता टिकवून ठेवणे गरजेचे आहे. यासाठी सक्षमा प्रकल्प महत्वाचा असून जास्तीत जास्त महिला बचत गटांनी या प्रकल्पाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील प्रदीप जांभळे पाटील यांनी यावेळी केले.
 
माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, शहरातील प्रत्येक घरातील महिलेने आवडीनुसार व्यावसायिक प्रशिक्षण घ्यायला हवे जेणेकरून तिचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. जर प्रत्येक घरातील स्त्री सक्षम झाली तर समाज आणि देश सक्षम होण्यास मदत मिळेल. त्यासाठी सर्व महिलांनी एकत्र येऊन या प्रकल्पात सहभाग घ्यायला हवा. तसेच सक्षमा प्रकल्प हा मर्यादित न राहता प्रत्येक प्रभागामध्ये महिलांना प्रशिक्षण घेण्याची सोय उपलब्ध करून द्यायला हवी, असे मत देखील माई ढोरे यांनी व्यक्त केले.
 
महिला बचत गटांचे सहकार्य सक्षमा प्रकल्पासाठी महत्वाचे आहे. त्यांना आधुनिक जगाशी स्पर्धा करण्यासाठी व्यावसायिक तसेच व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक आहे. याशिवाय विविध उत्पादनांचे प्रशिक्षण बचत गटांनी घेतल्यास त्यांच्यासाठी बाजारपेठांची नवी दारे खुली होण्यास मदत मिळेल. ठराविक उत्पादनांवर लक्ष केंद्रित न करता बाजारपेठांची गरज लक्षात घेऊन उत्पादने  बनविण्यावर महिलांनी लक्ष द्यायला हवे जेणेकरून त्यांच्या भांडवलात आणि उत्पादन मागणीमध्येही वाढ होईल, असे मत टाटा मोटर्सच्या गृहिणी प्रकल्पाच्या अध्यक्षा शिल्पा देसाई यांनी व्यक्त केले.
 
टाटा स्ट्राईव्हच्या सल्लागार अनिता राजन म्हणाल्या, देशातील ३० टक्के महिला अर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. जर सर्वच महिला कमवायला लागल्या तर कुटुंबासोबत देशाची देखील प्रगती होईल. तुमची प्रगती झाली तर समाजाची प्रगती होईल. तंत्रज्ञान एवढे विकसित झाले आहे की तुम्ही घरात बसून शिक्षण घेऊ शकता. महिलांना शिक्षीत करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य शासन आणि महापालिका सुद्धा अनेक योजना राबवित असते. या योजनांचा लाभ महिलांनी घ्यायला हवा. आर्थिक बाबींचे ज्ञान देखील महिलांना असायला हवे जेणेकरून त्यांना कोणताही व्यवसाय करताना अडचण येणार नाही. समाजात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी देखील महिलांनी एकत्र यायला हवे.
 
टाटा स्ट्राईव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय वंजारी म्हणाले, महिलांच्या प्रगतीसाठी टाटा ग्रुप वर्षानुवर्षे काम करत आला आहे. पुण्यातील टाटा मोटर्सच्या एका विभागात सर्व महिला कामगार काम करतात ही अभिमानास्पद बाब आहे. याचीच प्रेरणा घेऊन सक्षमा हा प्रकल्प सुरू करण्यात आला आणि या प्रकल्पास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. व्यवसाय करताना जिद्द, कौशल्य आणि व्यवसायाची रुपरेषा असणे खुप महत्वाचे आहे. याशिवाय व्यवसाय करताना आपली उत्पादने कोठे विकायची याची माहिती असणेही तितकेच महत्वाचे आहे. सक्षमा प्रकल्पाअंतर्गत एकत्र येऊन काम करण्याची महिलांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
 
टाटा ऑटोकॉम्प इंटीरीयर आणि प्लास्टिक डिझाईनच्या मानव संसाधन प्रमुख स्मिता जाधव म्हणाल्या, लघुउद्योगांमध्ये महिलांचा सहभाग वाढत आहे. आर्थिकवृद्धी आणि परिवर्तनासाठी हा सहभाग महत्वाचा ठरणार आहे. महिलांची एकजूट आणि त्यांची सामुहिक शक्ती आणि परिश्रम यामुळे कुटुंबाचा, समाजाचा आणि देशाचा विकास होऊ शकतो. घर चालविण्यापासून ते देश चालविण्यापर्यंत सर्व ठिकाणी महिलांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमुल, लिज्जत पापड हे व्यावसायिक महासंघ महिला एकत्रिकरणाच्या ताकदीचे उत्तम उदाहरण आहेत. एकमेकांस सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे एकत्रित येऊया आणि सक्षमा प्रकल्पाद्वारे सक्षम होऊन कुटुंब तसेच समाजाच्या विकासात बदल घडवूया.
 
सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी यावेळी इयत्ता ८ वी ते १० वी मधील विद्यार्थिथींना सायकल घेणेकामी अर्थसहाय्य, अटलबिहारी वाजपेयी – विधवा/घटस्फोटीत महिलांना किरकोळ स्वरूपाचा घरगुती व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य, मुलींना मोफत सायकल घेण्यासाठी अर्थसहाय्य, ६ महिने आणि २ वर्षे पुर्ण झालेल्या महिला बचत गटास अर्थसहाय्य, महाराष्ट्र राज्य मंडळ अंतर्गत शाळांमधील इयत्ता १० वी मधील मुलींना शैक्षणिक साहित्य घेणेकामी अर्थसहाय्य, बेटी बचाव बेटी पढाओ – पहिल्या मुलीवर कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलेस अर्थसहाय्य, अटलबिहारी वाजपेयी – महिलांना स्वयंरोजगारासाठी शिवणयंत्र घेण्यासाठी अर्थसहाय्य, महर्षी धोंडो केशव कर्वे – विधवा महिलांकरिता पुनर्विवाह प्रोत्साहन योजना, रामभाऊ म्हाळगी – मुलींना तांत्रिक प्रशिक्षण किंवा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी अर्थसहाय्य आदी योजनांची माहिती दिली. तसेच महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व योजनांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध असल्याने जास्तीत जास्त महिलांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले.
 
याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या पिंक ई-रिक्षा योजनेची देखील यावेळी माहिती देण्यात आली. त्यामध्ये महिला लाभार्थ्यांसाठी असणाऱ्या अटी, योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, योजनेची रचना, रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण आदी बाबींबाबत सविस्तर माहिती उपस्थित महिलांना देण्यात आली.
 
टाटा स्ट्राईव्ह फिल्ड समन्वयक निशा निमसे आणि सहकाऱ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने महिला मार्गदर्शन मेळाव्याचा समारोप झाला. या कार्यक्रमात महिलांनी नृत्य आणि संगीताच्या आधारे विविध सामाजिक संदेश देणारा कार्यक्रम सादर केला. यावेळी यशस्वीरित्या व्यवसाय करणाऱ्या उद्योजक महिला बचत गटांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये राधाकृष्ण महिला बचत गट, आदिश्री महिला बचत गट, जागृती महिला बचत गट, अंकुर महिला बचत गट, जागृती महिला बचत गट या बचत गटांचा समावेश होता.
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रियंवदा तोडणकर यांनी केले तर सुत्रसंचालन निशा नेमसे यांनी केले. तसेच आभार सक्षमा प्रकल्पाचे संचालक सचिन उपाध्ये यांनी मानले.