आंबा महोत्सवाला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद; ३१ मे २०२५ पर्यंत महोत्सव सुरू

आंबा महोत्सवाला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद; ३१ मे २०२५ पर्यंत महोत्सव सुरू
पुणे 28: महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत मार्केटयार्ड तसेच गांधी भवन-कोथरूड, मगरपट्टा-हडपसर आणि खराडी या चार ठिकाणी 'आंबा महोत्सव  २०२५' आयोजित करण्यात आला आहे. हा आंबा महोत्सव ३१ मे २०२५ पर्यंत सुरू राहणार असून आतापर्यंत ४५ हजार डझन आंब्याची विक्री झाली असून सुमारे ४ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम कळविले आहे.
 
या महोत्सवामध्ये रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या पाच जिल्ह्यातील भौगोलिक मानांकन (जीआय) मिळालेला हापूस आंबा तसेच राज्यातील केशर, पायरी तसेच इतर वाणांचा आंबा उपलब्ध आहे. कोकणातल्या हापूसच्या नावावर परराज्यातून आलेल्या आंब्याची सर्रास विक्री होते. पण आता जीआय मानांकनामुळे हापूसच्या नावे होणारी फसवणूक टाळली जाणार आहे. ही बाब विचारात घेऊन, या महोत्सवातदेखील जीआय मानांकन प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
 
आंबा महोत्सवामध्ये मार्केटयार्ड येथे ६० स्टॉल तसेच गांधी भवन-कोथरूड, मगरपट्टा-हडपसर आणि खराडी या ठिकाणी प्रत्येकी २० असे एकूण १२० स्टॉल्स १५० उत्पादकांना आंबा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जीआय व युआयडी टॅग लावलेला आंबा ग्राहकांना विक्री केला जात आहे. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. त्यात हापूस, केशर, पायरी आणि बिटकी (लहान) आंब्याचा समावेश आहे. महोत्सवामध्ये साधारणत: १७५ ते ३०० ग्रॅम वजनाच्या आंब्याची विक्री करण्यात येत असून ४०० ते ८०० रुपये प्रति डझन दर आहे, अशी माहिती देखील श्री. कदम यांनी दिली आहे.