क्रीडा आयुक्‍त शीतल तेली-उगले यांच्‍याकडे करंडक सुपूर्त

क्रीडा आयुक्‍त शीतल तेली-उगले यांच्‍याकडे करंडक सुपूर्त
पुणे दि. 27 : खेलो इंडिया युवा स्पर्धा पाठोपाठ राष्ट्रीय शालेय क्रीडा स्‍पर्धेतही सर्वसाधारण विजेतेपदकाचा करंडक महाराष्ट्राने पटकविला आहे. विजेतेपदकाचा करंडक क्रीडा व युवक कल्‍याण विभागाच्‍या आयुक्‍त शीतल तेली-उगले यांच्‍याकडे सुपूर्त करण्यात आला आहे.
 
 
गतविजेत्या महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे सर्वोत्तम कामगिरी करीत ६८ व्‍या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्‍पर्धेतही  महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपदाचा पराक्रम केला आहे. १९७ सुवर्ण, १५९ रौप्य, १७४ कांस्य अशी एकूण ५३० पदकांची लयलूट करीत  महाराष्ट्राने अव्वल स्थानाचे शिखर सर केले आहे. पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात विजेतेपदकाचा करंडक क्रीडा व युवक सेवा संचलनालय आयुक्‍त शीतल तेली-उगले यांच्‍याकडे सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक उदय जोशी यांनी सूपूर्त केला आहे. यावेळी उपसंचालक संजय सबनीस, क्रीडा अधिकारी अरुण पाटील उपस्‍थित होते.
 
महाराष्ट्राच्‍या खेळाडूंचे अभिनंदन करून आयुक्‍त शीतल तेली-उगले म्‍हणाल्‍या की, वरिष्ठ, युवा गटाप्रमाणेच शालेय स्‍पर्धेतही महाराष्ट अव्‍वल आहे. या यशाचे खेळाडूंसह त्‍यांचे प्रशिक्षक, पालक, संघटक या सर्वांनीच कौतुकास्‍पद कामगिरी केली आहे. ही परंपरा कायम राखण्यासाठी खेळाडूंच्‍या पाठी शासन खंबीरपणे उभे असेल.
 
 
दिल्‍ली,हरियाणा या बलाढ्य संघांना मागे टाकून महाराष्टाने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाला गवसणी घातली आहे.  दिल्‍लीने १२४ सुवर्ण,  ९४ रौप्य, ११८ कांस्य पदकांसह एकूण ३३६ पदके जिंकून दुसरे स्थान प्राप्त केले. हरियाणा संघ ११४ सुवर्ण,  ८० रौप्य, १०३ कांस्य एकूण २९७ पदकांसह तिसर्‍या स्थानावर राहिला. स्‍पर्धेत महाराष्ट्राचे २५२८ क्रीडापटू सहभागी झाले होते. ४२ खेळातील १५५ क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्‍या खेळाडूंच्‍या यशाचा डंका देशभरात वाजला आहे.
 
 
दिल्‍लीत संपन्‍न झालेल्‍या भारतीय शालेय स्‍पर्धा महासंघाच्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेत महाराष्ट्राला विजेतेपदाच्‍या करंडकाने गौरविण्यात आले. भारतीय शालेय खेळ महासंघाचे अध्यक्ष दिपक कुमार यांच्‍या हस्‍ते उपसंचालक उदय जोशी व  क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांनी राज्य्च्या वतीने विजेतेपदाचा करंडक स्‍वीकारला. याप्रसंगी देशभरातील राज्‍य प्रतिनिधी उपस्‍थित होते. महाराष्ट्राच्या पदक विजेत्या खेळाडूंचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी दृकश्राव्य प्रणालीव्दारे अभिनंदन केले आहे.
 
 
एकाच वर्षात राष्ट्रीय क्रीडा स्‍पर्धा,खेलो इंडिया युवा स्पर्धा व राष्ट्रीय शालेय क्रीडा स्‍पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्‍य ठरले आहे. शालेय गट, १८ वर्षांखालील युवा गट व वरिष्ठ गटात  विजेतेपदकाचा पराक्रम सलग दुसऱ्यांदा करणाऱ्याचा मानही महाराष्ट्राने पटकविला आहे. राष्ट्रीय क्रीडा स्‍पर्धा,खेलो इंडिया युवा स्पर्धा प्रमाणेच राष्ट्रीय शालेय क्रीडा स्‍पर्धेतील पदकविजेत्‍यांना क्रीडा व युवक सेवा संचलनालकडून रोख बक्षिस देण्याची परंपरा आहे. सुवर्ण, रौप्‍य व कांस्य पदक विजेत्‍यांना अनुक्रमे रू.११२५०, रू.८९५०, रू.६७५० तसेच सहभागी खेळाडूंनाही रू. ३७५० रूपयांचे रोख शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येत आहे.