घरोघरी तिरंगा- हर घर तिरंगा’ मोहिम अंतर्गत राखी कार्यशाळा

घरोघरी तिरंगा- हर घर तिरंगा’ मोहिम अंतर्गत राखी कार्यशाळा
पनवेल,दि.08 : पनवेल महानगरपालिकेमार्फत आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘घरोघरी तिरंगा- हर घर तिरंगा’ मोहिम पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 15 ऑगस्ट पर्यंत विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात राबविली जात आहे. या अंतर्गत रक्षाबंधनाचे औचित्य साधून ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम विविध शाळांमध्ये राबविण्यात आला. 
 
शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक पाच जीवन शिक्षण विद्यामंदिर मोठा खांदा तसेच रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूल कामोठे येथे घेण्यात आला. सैनिकांच्या प्रति आदर व स्नेह व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या दीर्घायुष्यासाठी घरोघरी तिरंगा हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत शाळा क्रमांक पाच जीवन शिक्षण विद्यामंदिर मोठा खांदा शाळेतील व रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूल सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी स्वतः राख्या तयार केल्या. या राख्या राजस्थान सीमेवरील सैनिकांना पालिकेच्यावतीने पाठविण्यात येणार आहेत.
 
मोठा खांदा मुख्याध्यापिका शोभा अवाड, रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूल मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे व सर्व शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी या राख्या तयार केल्या. सदर उपक्रमास समन्वय उपक्रमशील शिक्षक ज्ञानेश रामचंद्र आलदर  यांचे विशेष सहकार्य लाभले.