चिंचवडगाव ते थेरगावला जोडणाऱ्या ‘बटरफ्लाय’ पुलाच्या वाढीव खर्चाची चौकशी करा; मारुती भापकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

पिंपरी :-पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिंचवडगाव येथून थेरगावकडे जाण्यासाठी पवना नदीवर फुलपाखरु (बटरफ्लाय) आकाराचा पूल उभारला आहे. हा पूल उभारताना महापालिकेकडून २५ कोटी रुपये खर्च केले जाणार होते. परंतु, २५ कोटींचा खर्च अचानक सुमारे ४० कोटींवर गेला असून हा वाढीव खर्च कसा झाला, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे. त्या कामाची सखोल चौकशी करुन १५ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च नेमका कशावर केला, यांची तज्ज्ञांकडून चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
या तक्रारीत म्हटले आहे की, थेरगाव येथील प्रसुनधाम हौसिंग सोसायटी शेजारी १८ मीटर विकास आराखड्यातील रस्त्यावर चिंचवडगाव-थेरगाव हा फुलपाखरू (बटरफ्लाय) पूल बांधण्याचे काम महापालिकेने २०१७ मध्ये हाती घेतले. हा पूल थेरगाव आणि चिंचवड अशा दोन गावांना जोडणारा आहे. निविदा खर्च २५ कोटी १९ लाख रुपये अपेक्षित धरण्यात आला होता. त्यामध्ये धनेश्वर कन्स्ट्रक्शन यांनी १४ टक्के म्हणजेच २८ कोटी ७१ लाख रुपयांची निविदा भरली. अन्य दोन ठेकेदारांपेक्षा त्यांचा दर कमी असल्याने त्यांना या पुलाचे बांधकाम देण्यात आले. पुलाची १०७ मीटर लांबी, तर १८ मीटर रुंदी आहे. १८ महिन्यांच्या मुदतीत पुलाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे कामाला ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर या पुलासाठी थेरगाव बाजूकडील पोहोच रस्त्यास भिंत बांधणे, मुरूम टाकून भराव करणे, रस्त्याचे ‘सबग्रेड’चे काम व डांबरीकरण करणे, तसेच चिंचवड बाजूकडील रस्त्याचे ‘सबग्रेड’चे काम, डांबरीकरण आणि दिशादर्शक फलक अशी कागे पूर्ण करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली.
त्यासाठी ११ कोटी तीन लाख रुपयांचे काम एस.सी. कटारीया या ठेकेदाराला देण्यात आले. ऑगस्ट २०२३ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आला. कामाची मुदत सप्टेंबर २०२४ पर्यंत होती. या मुदतीत काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे २६ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. पुलाला जोडणाऱ्या एका बाजूचे काम अपूर्ण आहे. या मुदतीतही काम पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे पुलाच्या दोन टप्प्यातील कामावर ३९ कोटी ७४ लाख रुपये खर्च होऊनही पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना पुलाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, बटरफ्लाय पुलाचे काम २५ कोटी रुपयांवरुन ४० कोटी रुपयांवर जाऊनही हे काम मुदतीत पूर्ण झालेले नाही. या पुलाच्या कामांमध्ये संबंधित ठेकेदार, अधिकारी, सल्लागार व लोकप्रतिनिधी यांनी संगनमत करून मोठा भ्रष्टाचार केला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संपूर्ण कामाची तज्ञ लोकांकडून सखोल चौकशी करून यातील दोषींवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करावी, अशी मागणी भापकर यांनी केली आहे.