जीवनध्येय ज्यातून सापडते तो स्वधर्म डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर

जीवनध्येय ज्यातून सापडते तो स्वधर्म डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचन महोत्सवाचे उद्घाटन
 
पुणे : आपल्याला स्वतःचा स्वधर्म कळत नाही, इथे आपण चुकतो. धर्म, जात, प्रांत यावर आधारित धर्म नव्हे, तर आपल्याला स्वधर्म समजून घ्यायला हवा. भगवदगीता ही आपल्याला स्वधर्म शिकविते. ज्यातून खऱ्या अर्थाने जीवनध्येय सापडते, तो स्वधर्म आहे, असे जगद्गुरु कृपांकित डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर यांनी सांगितले.

 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने चातुर्मासानिमित्त प्रवचन महोत्सवाचे आयोजन टिळक स्मारक मंदिर येथे करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर , राजाभाऊ घोड़के, राजाभाऊ पायमोडे, ज्ञानेश्वर रासने, विलास रासकर, बंडू गावडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

 
डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर म्हणाले, भगवदगीचे भाष्य करणारे भाष्यकर्ते ज्ञानेश्वर महाराज आहेत. त्यांनी ज्ञानेश्वरीतून स्वधर्माचा विचार मांडला आहे. स्वामी विवेकांनद यांनी देखील सांगितलेल्या धर्माचे नाव विश्वधर्म होते, ते देखील आपण विसरत आहोत. संतांना जीवनध्येय समजले. त्यामुळे त्यांनी त्याची प्रतारणा केली नाही, असेही त्यांनी सांगितले.

 
प्रास्ताविकात महेश सूर्यवंशी म्हणाले, प्रवचनात स्वधर्म व जीवन ध्येय, कर्म व चरित्र निर्माण, मैत्रबंधुभाव व संगत, सुख, शांती व आनंद, आजचे जग व संतांचे विचार याविषयी चेतनानंद महाराज निरुपण करीत आहेत. यानिमित्ताने विश्वमाऊली ज्ञानोबाराय व जगद्गुरू तुकोबाराय यांचे मानवी जीवन समृद्ध व संपन्न करणारे चरित्र व तत्वज्ञान ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. दि. १८ जुलै पर्यंत दररोज सायंकाळी ६ ते ८ यावेळेत टिळक स्मारक मंदिरात प्रवचनमाला होत असून सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे.
 
डॉ. भावार्थ महाराज देखणे यांचा भारुड कार्यक्रम शनिवारी (दि. १९)
भारतीय संस्कृती व पंरपरा संपन्न असून यामध्ये अनेक कला जोपासल्या गेल्या आहेत. त्या लोककलांमधील भारुड ही प्राचीन कला. ह.भ.प.डॉ. भावार्थ महाराज देखणे हे भारुड कार्यक्रमातून हा कलाप्रकार उपस्थितांसमोर उलगडणार आहेत. शनिवार, दि. १९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता टिळक स्मारक मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे.
 
* फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने  चातुर्मासानिमित्त प्रवचन महोत्सवाचे आयोजन टिळक स्मारक मंदिर येथे करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर व विश्वस्त. यावेळी बोलताना जगद्गुरु कृपांकित डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर