रावेत बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी ७५ लाखांच्या खर्च स्थायीची मंजुरी

रावेत बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी ७५ लाखांच्या खर्च स्थायीची मंजुरी

पिंपरी :-पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पवना नदीवरील रावेत येथील बंधाऱ्यातून अशुद्ध उपसा करून निगडी, सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून शहराला पाणी पुरविले जाते. पवना नदीतील, इनटेक चॅनेलमधील गाळ व कचरा काढण्यासाठी ३८ लाखांचा खर्च केला जाणार आहे. टप्पा १ ते ४ मधील गाळ काढण्यासाठी ३७ लाखांचा खर्च केला जाणार आहे. असे एकूण ७५ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीची मान्यता देण्यात आली आहे
रावेत बंधारा येथील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा जमा झाला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पाणी साचण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे तेथील गाळ व कचरा काढण्यात येणार आहे. रावेत बंधारा आणि इनटेक चॅनेलमधील गाळ व कचरा काढण्यासाठी ५० लाख खर्चाची निविदा काढण्यात आली होती. त्यासाठी तीन निविदा पात्र ठरल्या होत्या. त्यात महाराष्ट्र अंडर वॉटर सर्व्हिसेस या ठेकेदाराची २४ टक्के कमी दराची ३७लाख ९९ हजार ९६२ रुपये दराची निविदा स्वीकृत करण्यात आली आहे.
येथील पंपिंग स्टेशनमधील टप्पा क्रमांक १ ते ४ मधील गाळ काढण्यासाठी ४८ लाख ८१ हजार २५० रुपये खर्चाची निविदा काढण्यात आली होती. त्या कामासाठीही महाराष्ट्र अंडर वॉटर सर्व्हिसेसची २४ टक्के कमी दराची ३७ लाख ९ हजार ७५० रुपये दराची निविदा स्वीकृत करण्यात आली आहे. या दोन्ही कामाची मुदत दीड वर्षे आहे. या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.
पंपिंग स्टेशनमधील मशिनरी दुरुस्तीसाठी ३३ लाख
रावेत येथील बंधाऱ्यातून अशुद्ध उपसा केंद्रातील टप्पा एक व दोनमधील पंपिंग स्टेशनची मशिनरी व विद्युत व्यवस्थेची वार्षिक देखभाल व दुरुस्तीचे कामासाठी ३३ लाख ३७ हजार ७१८ रुपये खर्च येणार आहे. या कामासाठी रिअल इलेक्ट्रीकल्स या ठेकेदाराची १५.३० टक्के कमी दराची निविदा स्वीकृत करण्यात आली आहे. त्यास आयुक्तांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.