पुणे :-: मोबाईलमध्ये व्हिडीओ काढण्याच्या वादातून मुंढवा येथील लोकल बारमध्ये फ्री स्टाईल हाणामारी करणार्या दोन्ही गटाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने या बारचा खाद्य परवाना रद्द करण्यात आला आहे.
लोकल बार हा मुंढव्यातील एसीबी रस्त्यावरील मॅट्रिक्स इमारतीत आहे. 1 फेबुवारीच्या रात्री राहुल जैसवार, रोहित जैसवार आणि रितीक उडता हे लोकल बारमध्ये मारहाण झाल्याचे सांगत मुंढवा पोलीस ठाण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्हीचे फुटेजची पाहणी केली.
31 जानेवारीच्या रात्री लोकल बारमधील मोबाईलमध्ये व्हिडीओ काढण्याच्या वादातून दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची माहिती मिळाली. तसेच हा घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता.
मात्र, दोन्ही गटाच्या वतीने फिर्याद देण्यासाठी पुढे आले नसल्याने सरकार पक्षातर्फे पोलिसांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन्ही गटा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निळकंठ जगताप करत आहेत.