अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकात अष्टपैलु कामगिरी करणाऱ्या भाविका अहिरे हिचा नागरी सत्कार...
भोसरी :-मलेशियात खेळल्या गेलेल्या आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने द. आफ्रिकेचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. यात पिंपरी चिंचवड शहर व भोसरी मतदारसंघातील 17 वर्षीय अष्टपैलु खेळाडू फलंदाज आणि यष्टिरक्षक भाविका मनोजकुमार अहिरे हिचा देखील मोलाचा वाटा होता.
या कामगिरीमुळे पिंपरी चिंचवड शहर व भोसरी मतदारसंघात उत्साहाचे भरते आले आहे. या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी प्रभागातील माजी नगरसेवक तथा माजी स्थायी समिती अध्यक्ष विलासभाऊ मडिगेरी हे मायदेशी परतणाऱ्या भाविकाच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित राहिले. तसेच तिची सेक्टर १० येथील राहत्या सोसायटी जवळ वाजत गाजत सोसायटी धारकांच्या उपस्थितीत मिरवणूक देखील काढली.
.यावेळी सोसायटी धारकांच्या उपस्थितीत भाविकाचा नागरिक सत्कार करण्यात आला. यावेळी भाविकाचे आई-वडील, मनोजकुमार अहिरे तसेच तीचे प्रशिक्षक संजय हाडके सर आणि सोसायटीतील आजी-माजी पदाधिकारी, सभासद, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
भाविकाचे कौतुक करताना विलासभाऊ मडिगेरी म्हणाले, या मोहिमेत पिंपरी चिंचवड शहरातील दोन अष्टपैलू खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. भोसरी मतदारसंघातील 17 वर्षीय अष्टपैलु खेळाडू भाविका मनोजकुमार अहिरे आणि निगडीतील ईश्वरी अवसारे या दोन तरुण महिला खेळाडूंनी व पिंपरी चिंचवड शहराची आज खऱ्या अर्थाने मान उंचावली आहे. व यात भाविका अहिरे हिची खेळी विशेष लक्षणीय ठरली. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अजिंक्य राहिला. आयसीसी अंडर १९ महिला टी-२० विश्वचषक २०२५ मध्ये विजयी झाल्याबद्दल भारतीय संघाचे सर्वप्रथम अभिनंदन. हा विजय उत्कृष्ट सांघिक कामगिरी तसेच खेळाडुंच्या दृढनिश्चयाचा प्रतिक आहे. यामुळे अनेक येणाऱ्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल. आपला महाराष्ट्र व पिंपरी चिंचवड शहराचे नाव, मान उंचावेल.