टाटा प्रोजेक्ट चे विनायक पै यांची स्वेरीला सदिच्छा भेट

पंढरपूर- जगविख्यात टाटा ग्रुपच्या, टाटा प्रोजेक्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक विनायक पै यांनी गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला अलीकडेच सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी इंजिनिअरिंग आणि एमबीए च्या विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक पै हे विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘भारतीय अर्थव्यवस्थेची जगामध्ये चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर सरशी झालेली आहे आणि त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग, इन्फ्रास्ट्रक्चर आणि इतर पायाभूत क्षेत्रांमध्ये नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होत आहेत आणि त्यासाठी भविष्यात अभियंत्यांची खूप गरज आहे. इतर क्षेत्रांमध्ये देखील भारतामध्ये नवनवीन रोजगारांच्या संधी उपलब्ध होत आहेत पण त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची आवश्यकता यामध्ये प्रतिभा, ज्ञान, संभाषण कौशल्य आणि तांत्रिक कौशल्य यांचा समावेश होतो. आपण कुठेही काम करताना आपल्या कामातील गुणवत्ता सिद्ध केली पाहिजे.’ असे सांगून त्यांनी स्वेरीतील संस्कृती आणि शिस्तीचे मनसोक्त कौतुक केले. स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांच्या विशेष प्रयत्नातून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम.पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार हे उपस्थित होते. विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, एमबीएच्या विभागप्रमुख डॉ. मिनल भोरे, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाचे प्रा. अविनाश मोटे यांच्यासह प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.