स्वेरीला ‘सस्टेनेबल इन्स्टिट्यूशन्स ऑफ इंडिया- ग्रीन रँकिंग्ज २०२५’ मध्ये ‘गोल्ड’ मानांकन

पंढरपूर: गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) ला ‘सस्टेनेबल इन्स्टिट्यूशन्स ऑफ इंडिया- ग्रीन रँकिंग्ज २०२५’ अंतर्गत ‘उत्कृष्टतेचे प्रमाणपत्र’ प्रदान करण्यात आले आहे. हा प्रतिष्ठित सन्मान आर वर्ल्ड इन्स्टिटुशनल रँकिंग तर्फे दिला जातो, जे भारतातील शैक्षणिक संस्थांच्या शाश्वत शिक्षण व्यवस्थापनाचा आढावा घेणारे महत्त्वपूर्ण मानांकन आहे. मार्च २०२५ मध्ये आर वर्ल्ड इन्स्टिटुशनल रँकिंगच्या वतीने देशभरातून वेगवेगळ्या संस्थांना सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार स्वेरीने सुद्धा सहभाग नोंदवला होता. कागदपत्रांची व माहितीची छाननी पूर्तता बघून मानांकना संदर्भातील निकाल या मार्च २०२५ च्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या वेबसाईटवर जाहीर केला व मानांकन दिले.
आर वर्ल्ड इन्स्टिटुशनल ग्रीन रँकिंग्स – सस्टेनेबल इन्स्टिट्यूशन्स ऑफ इंडिया (एसआयआय) ही एक अग्रगण्य संस्था आहे जी उच्च शिक्षण संस्थांनी पर्यावरणीय शाश्वततेसाठी घेतलेल्या उल्लेखनीय पुढाकारांना ओळख देण्याचे आणि सन्मानित करण्याचे उद्दिष्ट ठेवते. या रँकिंगच्या माध्यमातून ऊर्जा कार्यक्षमता, कचरा व्यवस्थापन, जलसंधारण, जैवविविधतेचे संरक्षण आणि शाश्वत नवोपक्रम प्रकल्प यांसारख्या विविध निकषांवर संस्थांचे मूल्यमापन केले जाते. संस्था पर्यावरणीय जबाबदारी स्विकारून जागतिक दर्जाच्या शाश्वत मॉडेल्सचा अवलंब करतील, असा प्रेरणादायी संदेश ग्रीन रँकिंग्स – एसआयआय देतात तसेच, संस्थांना हरित उपक्रम राबविण्यासाठी प्रोत्साहन देत, शाश्वत विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलण्यास प्रवृत्त करण्याचे कार्य ही संस्था करत आहे. स्वेरीने स्थापनेपासून सामाजिक कार्य, एकादशी, वारी काळात केलेले समाज कार्य, ग्रामीण भागात विविध ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केलेले कार्य, स्वच्छता मोहीम, ग्रीन कॅम्पस धोरणे, ऊर्जा बचत व संवर्धन, पर्यावरणपूरक उपक्रम आणि शाश्वत शिक्षण प्रणाली तसेच सौरऊर्जेचा वापर, कचऱ्याचे व्यवस्थापन, जलसंवर्धन, वृक्षारोपण आणि कार्बन फूटप्रिंट कमी करणे अशा विविध निमित्ताने केलेल्या कार्याची दखल आर वर्ल्ड इन्स्टिटुशनल रँकिंगने घेतली आणि स्वेरीला ‘गोल्ड’ श्रेणी बहाल केली. सध्या जगभरात शाश्वत विकास आणि पर्यावरणपूरक शिक्षणाला प्राधान्य दिले जात आहे तसेच स्वेरी कडून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या संकल्पनांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन सातत्याने केले जाते. या मानांकनामुळे स्वेरीच्या पर्यावरणपूरक आणि शाश्वत, जबाबदार शिक्षण व्यवस्थापनास राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार व इंटरनल क्वालिटी अशुरन्स सेल (आयक्युएसी) चे समन्वयक डॉ. एस.एस. वांगीकर यांनी या गौरवाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, 'स्वेरीच्या संपूर्ण शाश्वत शिक्षणाच्या दिशेने घेतलेल्या पुढाकाराला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे. भविष्यातही आम्ही पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासासाठी नव्या उपक्रमांची अंमलबजावणी करत राहू. ही मान्यता स्वेरीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची पावती असून, भविष्यातही संस्था पर्यावरणपूरक शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञान यामध्ये नवकल्पना राबविण्यासाठी कटिबद्ध राहील.' या यशाबद्दल स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख इतर विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, स्वेरी अंतर्गत असणाऱ्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी स्वेरीच्या 'आयक्युएसी' विभागात कार्यरत असलेल्या प्राध्यापकांचे अभिनंदन केले.