पै. विजय नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ तालीम मध्ये २१०० दिवे लावून केला जागतिक विक्रम
पिंपरी, पुणे (दि. १० एप्रिल २०२५) भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिक मध्ये पदके मिळवायची असतील, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या "खेलो इंडिया" या प्रकल्पातून जास्तीत जास्त युवा खेळाडूंनी सहभाग घेऊन आपली क्षमता सिद्ध केली पाहिजे. यातून पुढे आलेले खेळाडू जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळून अनुभव मिळवतील. हा अनुभव, सराव आणि योग्य प्रशिक्षक, मार्गदर्शकाच्या सल्ल्याने खेळाडूंना नक्की यश मिळेल. पै. विजय नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला जागतिक विक्रम इतर खेळाडूंना प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी केले.
गुरुवारी (दि. १० एप्रिल ) रहाटणी, ता. हवेली, जि. पुणे येथील भैरवनाथ तालीम येथे पै. विजय नारायण नखाते यांच्या नेतृत्वाखाली आखाड्यामध्ये एकाच वेळी २१०० तेलाचे दिवे प्रज्वलित करून जागतिक विक्रम करण्यात आला. या विक्रमाची नोंद "इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड" मध्ये घेण्यात आली. त्याचे प्रमाणपत्र पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या हस्ते पै. विजय नखाते यांना देण्यात आले.
यावेळी ऑलिम्पिक वीर पै. मारुती आडकर, अर्जुन पुरस्कार गोपाळ देवांग, राष्ट्रीय खेळाडू राजाराम पाटील, आण्णा शेलार, संतसेवक बाळासाहेब वाघेरे, जावळे महाराज, ज्ञानेश्वर कोकणे, युवा महाराष्ट्र केसरी पै. किशोर नखाते, प्रशिक्षक भाऊसाहेब लांडगे, कपिल मिसाळ, युवा कीर्तनकार संतोष महाराज काळोखे, संदीप महाराज जाधव, सुनील कुंजीर, रहाटणी व परिसरातील ग्रामस्थ, नागरिक व युवा खेळाडू उपस्थित होते.
ऑलिम्पिक वीर पै. मारुती आडकर म्हणाले की, पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्यासारखे उत्तुंग व्यक्तीमत्व पुन्हा होणे नाही. तरुणपणात सैन्यात भरती होऊन वयाच्या ८४ व्या वर्षापर्यंत कार्यरत आहेत. पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत अनेक खेळात सुवर्णपदके आणि ब्रिटनच्या राणीकडून सन्मान मिळवणारे ते एकमेव भारतीय खेळाडू आहेत. त्यांचा आदर्श समोर ठेवून खेळाडूंनी सराव करून यश मिळवावे असे पै. आडकर म्हणाले.
गोपाळ देवांग यांनी सांगितले की, मी ऑलिम्पिक आडकर यांना आणि पद्मश्री पेटकर यांना आदर्श मानून खेळात प्राविण्य मिळवले. खेळात नियमित सराव आणि आत्मविश्वास आवश्यक आहे.
पै. विजय नखाते यांनी स्वागत करताना सांगितले की, आपल्या गावातील युवा पहिलवानांना मोठ्या दिग्गज खेळाडूंचा सहवास घडावा. त्याचबरोबर आपल्या भैरवनाथ तालीम चे नाव देशभर आदराने घेतले जावे, म्हणून २१०० तेलाचे दिवे एकाच वेळी प्रज्वलित करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. या विक्रमाचे मिळालेले प्रमाणपत्र मी आदराने भैरवनाथ महाराज चरणी समर्पित करतो.
इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड चे संस्थापक अध्यक्ष आणि सीइओ आयुष गुप्ता, राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक हरके आणि ब्रँड ॲम्बेसीडर ईशा अगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा जागतिक विक्रमाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक हरके यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे व जागतिक विक्रमाच्या नोंदणी प्रमाणपत्राचे वाचन टी. बी. शिंदे यांनी केले आणि संस्थेच्या वतीने भैरवनाथ तालीमचे सर्व पदाधिकाऱ्यांना आणि युवा खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
आभार सुनील कुंजीर यांनी मानले.