स्वेरीमध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

स्वेरीमध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पंढरपूरः गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या भव्य प्रांगणात भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
        स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.एम. पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 

भारतमातेच्या प्रतिमा पूजनाने या कार्यक्रमाला  सुरवात झाली. स्वेरीचे विद्यार्थी अनुजा शिरगुर, वेदांत देशमुख, पियुष चोपडे व साक्षी शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेल्या भाषणांतून भारतातील विविध क्षेत्रातील वस्तुस्थिती, युवकांवरील जबाबदारी, भारतीय संस्कृती, शिक्षण, आरोग्य, क्रीडा आदी विषयावर उत्तम पद्धतीने विचार मांडले. डिप्लोमा च्या विद्यार्थिनी सानिया भंडारे यांनी ‘ओ देश मेरे तेरी शान पे सदके... व एमबीए च्या विद्यार्थिनी  शेल्विका बोडयाल यांनी ‘ए मेरे वतन के लोगो, जरा याद करो कुर्बानी .....’ हे देशप्रेमी गीत सुमधुर आणि अप्रतिम सुरात गायले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अधिष्ठाता डॉ. पी.एम. पवार म्हणाले कि, ‘आजच्या युवकांसमोर देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने अनेक आव्हाने आहेत. आज स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही आपण विज्ञान तंत्रज्ञानाच्या स्वयंपूर्ण नाही. त्यासाठी आपल्याला पाश्चात्य व इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. आजच्या तरुणांनी आपल्या अभ्यासातून आणि संशोधनातून हे परावलंबित्व कमी केले पाहिजे.' प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध विभागांच्या संशोधन पत्रिकांचे व 'स्वेरीयन' या त्रैमासिकाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस.व्ही.मांडवे, इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम.एस.मठपती, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक,  रजिस्ट्रार राजेंद्र झरकर, बालाजी सुरवसे, अमोल चंदनशिवे, शिक्षकेतर कर्मचारी व चारही महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक्षा गुन्नुर, ट्विंकल कदम व प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी केले तर मिठाई वाटपाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.