ट्रस्ट ॲाडिट सप्टेंबर अखेर दाखल करण्यास मुदत

सार्वजनिक ट्रस्ट व धर्मादाय संस्थांचे वार्षिक लेखापरीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) सप्टेंबर अखेर पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे प्रकरण पाच अंतर्गत कलम ३१ अ ते ३४ नुसार व त्याअंतर्गत नियम सतरा ते एकवीस प्रमाणे दरवर्षी सनदी लेखापालांकडून आर्थिक वर्ष संपल्यापासून सहा महिन्याचे आत लेखापरीक्षण करून घ्यावे लागते. संपूर्ण ॲाडिट रिपोर्ट आयकर विभागाच्या पोर्टल वर ॲानलाईन सादर करावा लागतो. त्यानंतर धर्मादाय विभागाच्या वेबसाईट वर ३० सप्टेंबर पूर्वी हा संपूर्ण ॲाडिट रिपोर्ट अपलोड करावा लागतो. लेखापरीक्षण अहवाल अपलोड झाल्यावर त्याची ॲानलाईन पोहोच प्राप्त होते. या ॲानलाईन पोहोचवर तीन विश्वस्तांच्या आणि सनदी लेखापालांच्या नाव आणि सहीसह
लेखापरीक्षण अहवालाचा संच म्हणजेच वार्षिक ताळेबंद (बॅलन्स शीट), वार्षिक उत्पन्न आणि खर्चाचे विवरण, फॉर्म ९ ड नुसार सर्व विश्वस्तांची पूर्ण नावे आणि पॅन कार्ड क्रमांक आणि संबंधित ट्रस्टला फक्त देशांतर्गत व्यक्ती आणि संस्थांकडूनच देणगी मिळाली असल्याचा सनदी लेखापालांचा दाखला लेखापरीक्षण अहवालासोबत जोडून जिल्ह्यातील न्यास नोंदणी कार्यालयाच्या लेखा (अकाउंट) शाखेत जमा करून पोहोच घेणे आवश्यक आहे.
धर्मादाय संस्थांच्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या किती टक्के अंशदान आकारण्यात यावे याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच काही याचिकांचे निर्णय देताना राज्य शासनाला दिले आहेत. शासनाचा निर्णय झाल्यावर न्यासावर अचानक आर्थिक दायित्व येवू नये म्हणून यापूर्वी प्रमाणे किमान दोन टक्के इतक्या अंशदान रकमेची तरतूद लेखापरीक्षण अहवालामध्ये करावी.
एड. शिवराज कदम जहागिरदार
माजी अध्यक्ष, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे